

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यभरातून 115 पात्रताधारकांनी अर्ज केले आहेत. यात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह 16 जणांचा समावेश आहे.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा पाच वर्षांचा कार्यकाल 6 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला. त्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी नूतन कुलगुरूची निवड होणे अपेक्षित होते. त्यानंतर कुलगुरू निवड समिती तीन सदस्यांपैकी एकाच सदस्याची निवड करण्यात आली. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभारी कार्यभार सोपवला आहे. कुलपती कार्यालयाने नूतन कुलगुरूपदासाठी 23 डिसेंबर ते 27 जानेवारी या कालावधीत अर्ज मागवले होते.
भरतियार विद्यापीठ, कोईम्बतूर येथील प्रा. एस. सरवनन यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. शेवटच्या दिवसापर्यंत 115 जणांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे डॉ. श्रीकृष्ण महाजन, पत्रकारिता विभागाच्या डॉ. निशा मुडे, रसायनशास्त्र विभागाचे डॉ. आर. जी. सोनकवडे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. एस. एस. कोळेकर, डॉ. एस. व्ही. कोळेकर आदींचा समावेश आहे. प्राप्त अर्जाची लवकरच छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर फेब—ुवारीमध्ये निवड समितीकडून मुलाखत होउन पाच उमेदवारांची नावे अंतिम केली जातील. या पाच जणांमधून एकाची कुलगुरू म्हणून निवड केली जाणार आहे.