

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षान्त समारंभ उद्या, शुक्रवारी (दि. २७) माजी लष्करप्रमुख, द मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटचे मानद कर्नल जनरल जे. जे. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर राज्यपाल जिष्णू देव वर्मा अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणातील सभागृहात होणाऱ्या या दीक्षान्त समारंभात ६० हजार २५० स्नातक पदवी प्रमाणपत्र प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती सुवर्णपदक तनुजा साळोखे, तर कुलपती सुवर्णपदक वेदिका कदम यांना प्रदान केले जाणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ४८ स्नातकांना पीएच. डी. पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल. डॉ. दीपक सावंत यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातून सोलापूर जिल्हा स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच ६० हजार २५० विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत. यंदा जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे समोर येत आहे.
विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचे मानचिन्ह किंवा गाऊन घालून फोटो काढावेत. दीक्षान्त समारंभ सुरू असताना मुख्य इमारतीसमोर आणि अश्वारूढ पुतळा परिसरात फोटो काढण्यास मनाई आहे. कार्यक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थी फोटो काढू शकतात. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्य मापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्राचे समन्वयक डॉ. डी. बी. सुतार आदी उपस्थित होते.
५० स्टॉलवर घेता येणार पदवी प्रमाणपत्र
दीक्षान्त समारंभात ६० हजार २५० पैकी २० हजार ५३ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र स्वीकारणार आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ५० स्टॉलवर पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याची सोय केली आहे. विद्यापीठ परिसरात लावलेले क्यूआर कोड स्कॅन केला की, आपल्या विषयाचे पदवी प्रमाणपत्र कोणत्या स्टॉलवर मिळणार याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
सोलापूर जिल्हा स्वतंत्र झाल्यापासून यंदा
प्रथमच स्नातकांची संख्या ६० हजारांवर
२० हजार ०५३ विद्यार्थी प्रत्यक्ष पदवी स्वीकारणार
४० हजार १९७ विद्यार्थी पोस्टाद्वारे पदवी घेणार
पदवीप्राप्त विद्यार्थिनींची संख्या ३४,६७०
पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या २५,५८०
पदवीप्राप्त स्नातकांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त
यावर्षी पदवी घेणाऱ्या स्नातकांमध्ये ८ हजाराने वाढ
पदवी वितरणासाठी ५० स्टॉलची सुविधा
स्टॉल क्रमांकाची माहिती मिळणार स्कॅन कोडद्वारे