Shivaji University | शिवाजी विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील झेप कौतुकास्पद

केंद्रीय अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील; ६४ वा वर्धापन दिन उत्साहात
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील. यावेळी व्यासपीठावर डावीकडून प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. पी. थनिकैवलन, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, डॉ. विलास शिंदे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील. यावेळी व्यासपीठावर डावीकडून प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. पी. थनिकैवलन, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, डॉ. विलास शिंदे. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने गेल्या ६४ वर्षांत शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. ही प्रगती अनेक पिढ्यांतील प्राध्यापक, संशोधक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे फलित आहे. विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रगती कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्‌गार भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्चशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी काढले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या युगात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. चेन्‍नई येथील केंद्रीय चर्म संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. थनिकैवलन आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते. डॉ. थनिकैवलन म्हणाले, विद्यापीठ, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्या सहकार्यातून स्थानिक चर्मोद्योगाला नवी दिशा मिळू शकते.

कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीसाठी गुणवत्ता, संशोधन, कौशल्य, समावेशन आणि सुशासन ही पंचसूत्री मांडली. स्थानिक उद्योगांच्या प्रश्नांवर संशोधन, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे आनंदराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजाराम गुरव, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. अजय साळी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना विद्यापीठाची दिशा

ग्रामीण आणि दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे. मात्र, योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि संधींच्या अभावामुळे अनेकदा त्यांच्या क्षमतांना अपेक्षित व्यासपीठ मिळत नाही. ही दरी दूर करण्यासाठी विद्यापीठाने केवळ उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता परिसरातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना नियमितपणे विद्यापीठात आमंत्रित करून विविध शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, संशोधन प्रकल्प आणि आधुनिक उपकरणांची प्रत्यक्ष ओळख करून द्यावी, असेही आनंदराव पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.