

कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत केलेल्या प्रशासकीय मूल्यांकनात शिवाजी विद्यापीठाने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेबरोबर प्रशाकीय गुणवत्ता सिद्ध करीत शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मूल्यांकनात गोंडवाना विद्यापीठ पहिला, मुंबई विद्यापीठाने दुसरा क्रमांक मिळवला. सावित्राबई फुले पुणे विद्यापीठ सर्वात कमी गुण मिळवून पिछाडीवर राहिले आहे.
राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने नुकताच प्रशासकीय मूल्यांकन अहवाल जाहीर केला आहे. सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम, कर्मचार्यांची अद्ययावत ज्येष्ठता सूची, सेवा पुस्तके अद्ययावत ठेवणे आणि ती डिजिटल करणे, सरळ सेवा नियुक्ती रिक्त स्थिती, बिंदूनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, ‘आयजीओटी’ पोर्टलवर रजिस्ट्रेशन आदी महत्त्वाच्या निकषासाठी 100 गुण देण्यात आले. क्रमवारीत गोंडवाना विद्यापीठ पहिला क्रमांक (68 गुण), मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ (66 गुण) अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सर्व कर्मचार्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे व डिजिटल करणे या घटकासाठी शून्य गुण मिळाले, तर याच विभागात मुंबई, कोल्हापूर, गोंडवाना व अमरावती विद्यापीठांनी 20 पैकी 20 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मूल्यांकनाबाबत विद्यापीठ वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मूल्यांकनावर काही कर्मचारी, माजी पदाधिकार्यांनी सवाल उपस्थित केला आहे.
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर म्हणून आहे; परंतु उच्चशिक्षण विभागाच्या प्रशासकीय मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास 100 पैकी केवळ 42 गुण मिळाले आहेत. ही चिंतेची बाब असून यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.