

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षांत समारंभास गुरुवारी ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सव आणि ‘संत ज्ञानेश्वर माऊली सार्थसप्तशताब्दी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात प्रारंभ झाला. विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला.
गुरुवारी सकाळी कुलगुरू डॉ. आर. के. कामत व प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करून दिंडीला प्रारंभ झाला. पालखीमध्ये संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा, भारतीय संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्रग्रंथ, आधुनिक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तके तसेच डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मचरित्र ठेवण्यात आले होते.
दिंडीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक व एनसीसीच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ग्रंथदिंडीमध्ये कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजाराम गुरव, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. अजय साळी, डॉ. क्रांतिकुमार पाटील, डॉ. सागर डेळेकर, डॉ. सावलीराम घाणे, डॉ. कबीर खराडे, प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुजय पाटील आदी उपस्थित होते.
हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध
विद्यापीठाच्या अनेक्स इमारत परिसरात ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू व प्र-कुलगुरू यांच्या हस्ते झाले. महोत्सवात २८ स्टॉल असून त्यामध्ये १४ प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांचा सहभाग आहे. विविध विषयांवरील हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थांचे स्टॉलही आकर्षण ठरत आहेत. दुपारच्या सत्रात ‘संत ज्ञानेश्वर माऊली सार्थसप्तशताब्दी : विद्वत परिषद’ हा आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यास उपस्थितांचा प्रतिसाद मिळाला.