

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडे राज्याचे विद्यापीठ क्रीडा धोरण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. शरद बनसोडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही कोल्हापूरच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानास्पद बाब आहे.
कोल्हापूर क्रीडा पंढरी म्हणून ओळखली जाते. खाशाबा जाधव यांच्यापासून वीरधवल खाडे तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वप्निल कुसाळेपर्यंतच्या या भूमीने ऑलिम्पिक वीर देशाला दिले आहेत. त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला क्रीडा परंपरेचा वारसा आजही कोल्हापूरचे खेळाडू व प्रशिक्षक जपत आहेत.
क्रीडा धोरण तयार करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यांच्या बैठका सध्या सुरू आहेत. या धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. यात प्रमुख कुस्ती, कबड्डी, जलतरण, धनुर्विद्या, ॲथलेटिक्स, नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस यासह हॉकी, हँडबॉल खेळांचा समावेश आहे. क्रीडा धोरणामध्ये महाविद्यालयीन, विद्यापीठ खेळाडूंना त्याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण व उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभाग करण्याची संधी मिळणार आहे.
त्याचबरोबर खेळाडूंची कामगिरी वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ पुरस्कार विजेते, स्पोर्टस् मानसोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, अशा अनुभवींच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडू क्रीडा क्षेत्राकडे वळतील आणि महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये सरावासाठी जाणारे खेळाडू हे महाराष्ट्रामध्येच सरावासाठी राहतील ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि जागतिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार होतील यासाठीच्या आवश्यक बाबींचा धोरणात समावेश असणार आहे.