Shivaji University anniversary | संवेदनशील, मूल्यवान नागरिक घडविण्याची विद्यापीठांवर जबाबदारी

कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी; शिवाजी विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात
Shivaji University anniversary
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ वर्धापन दिन समारंभात कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना जैव-रसायनशास्त्र अधिविभागाच्या प्रा. डॉ. पद्मा दांडगे. समवेत प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. सुहासिनी पाटील. दुसर्‍या छायाचित्रात बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. विकास मिणचेकर.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाला पर्याय नाही. त्याद़ृष्टीने शिवाजी विद्यापीठाने गेल्या 63 वर्षांत केलेली वाटचाल दिशादर्शक आहे. संवेदनशील व मूल्यवान नागरिक घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांवर आहे, असे प्रतिपादन जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या 63 व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या. विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार जीव-रसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. पद्मा दांडगे यांना तर बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जयसिंगपूरच्या गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयातील डॉ. विकास मिणचेकर यांना प्रदान करण्यात आला.

कुलगुरू डॉ. माहेश्वरी म्हणाले, उच्चशिक्षण व्यवस्थेकडून सर्वच घटकांच्या वाढत्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक उदासीनतेचेही वातावरण आहे. खासगी व परदेशी विद्यापीठांचे आव्हानही सामोरे उभे आहे. अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा थोडक्यात वेध घेतला. एकाचवेळी आयुष्यात फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या नावाशी आणि कर्मभूमीशी जोडले गेल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठाने वाटचालीत सातत्यपूर्ण गती राखली. ही गती योग्य वेळेत योग्य दिशेने ठेवली. शिवाजी विद्यापीठ केवळ पदवीधर नव्हे तर विचारवंत, उद्योजक, समाजसेवक व राष्ट्रनिर्माते घडविण्यास कटिबद्ध आहे.

याप्रसंगी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय व कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कारप्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजाराम गुरव, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. अजय साळी, डॉ. धनंजय सुतार, डॉ. शरद बनसोडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.