कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा (Shivaji University) 61 वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (दि. 17) होणार आहे. या कार्यक्रमासाठी पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी कुलपती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन असतील. विद्यापीठ प्रांगणातील राजमाता जिजाऊ सभागृहात सकाळी 11 वाजता होणार्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांसह कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन नियंत्रक मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
यंदा 51 हजार 492 स्नातकांपैकी 14 हजार 269 स्नातक प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत. 37 हजार 223 स्नातकांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन केले आहे. समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे.
यावर्षीही विद्यापीठातील विविध अधिविभागांतून पदवी संपादन करणार्या स्नातकांमध्ये मुलींनी बाजी मारली असून एकूण स्नातकांमध्ये मुलींचे प्रमाण 55 टक्के आहे. यंदा प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी घेणार्यांमध्ये 5856 विद्यार्थी, तर 8413 विद्यार्थिनींचा समावेश आहे. उर्वरित 37 हजार 223 विद्यार्थ्यांना पोस्टाने दीक्षान्त समारंभादिवशीच पदवी प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे. तसेच यंदा थेट मोबाईलवर पदवी प्रमाणपत्र मिळेल अशी सुविधा उपलब्ध केली आहे.
यंदा दीक्षान्त समारंभात पदवी प्रमाणपत्र घेणार्या एकूण स्नातकांपैकी सर्वाधिक 20 हजार 500 स्नातक सायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागातील आहेत. त्या खालोखाल कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभाग- 16 हजार 952 विद्यार्थी, मानव्यशास्त्र- 11 हजार 483, तर अन्य आंतरविद्याशाखेतील 2,530 स्नातकांचा समावेश आहे.
देशात संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या बहुतेक पुरस्कारांचे मानकरी असलेले डॉ. लेले हे अव्वल दर्जाचे संशोधक आहेत. अमेरिकेतील डेलवर विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली आहे. शास्त्रज्ञ म्हणून ज्या संस्थेत काम सुरू केले, त्याच एनसीएल संस्थेच्या सर्वोच्चपदी ते विराजमान आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 75 शोधनिबंध डॉ. लेले यांच्या नावावर असून, त्यांच्याकडे सहा पेटंट आहेत. दीक्षान्त समारंभात त्यांच्या मार्गदर्शनाविषयी उत्सुकता आहे.