

डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय मानल्या जाणार्या शिवाजी पूल तेतावडे हॉटेल उड्डाणपूल प्रकल्पाची प्रक्रिया अद्यापही कागदावरच अडकली आहे. सल्लागार कंपनी नेमणे आणि युटिलिटी शिफ्टिंगसारख्या प्राथमिक टप्प्यांनाही महापालिकेला मुहूर्त सापडलेला नाही.
शहराच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा उड्डाणपूल प्रकल्प सध्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणारा हा प्रमुख प्रवेशमार्ग असून, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर येथे जाण्यासाठी याच मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
उड्डाणपूल उभारण्याची निविदा व निधी प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत होणार असली, तरी सल्लागार कंपनीची नियुक्ती, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे आणि मार्गातील वीज, पाणी, दूरसंचार यासारख्या युटिलिटी शिफ्टिंगची जबाबदारी महापालिकेवर आहे. मात्र, सल्लागार कंपनी नेमण्यासाठीची निविदा काढण्याची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही.
मधल्या काळात पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने कामाला गती मिळाली नाही. आता सभागृह अस्तित्वात आले असले, तरी समित्यांच्या नियुक्त्या आणि अंतर्गत प्रक्रियांमुळे निर्णय प्रक्रिया रखडल्याचे दिसते. दरम्यानच्या काळात प्रशासनाने पुढाकार घेतला असता, तर प्रकल्पाला वेग मिळू शकला असता; मात्र तशी मानसिक तयारी दिसत नाही.
2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे 5.48 लाख होती. सध्या ती सात लाखांच्या घरात पोहोचल्याचा अंदाज आहे, तर फ्लोटिंग पॉप्युलेशन तीन लाखांपर्यंत आहे. जिल्ह्यातील वाहनसंख्या 22 लाखांहून अधिक झाली आहे. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि व्यापारी द़ृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. चौकांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता उड्डाणपुलाची गरज प्रकर्षाने अधोरेखित होते. कोल्हापूरच्या विकासाला गती देणारा हा प्रकल्प कागदोपत्रीच राहणार का, की प्रशासन लालफितीचा अडसर दूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रक्रियेला हवी गती
शिवाजी पूल ते तावडे हॉटेल उड्डाणपूल प्रकल्पासाठी सल्लागार कंपनी नेमण्याची प्रक्रियाच महापालिकेने सुरू केलेली नाही. डीपीआर आणि युटिलिटी शिफ्टिंग रखडल्याने प्रकल्प लालफितीत अडकला आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.