MLA Shivaji Patil | ‘मुश्रीफ साहेब मला खाणार की, मी त्यांना खाणार? चला, बघूया’

आमदार शिवाजी पाटील यांच्या मिश्कील टिपणीने महायुतीच्या बैठकीत हास्यकल्लोळ
Hasan Mushrif on  Gokul Dairy Election
Hasan Mushrif Shivajirao PatilPudhari
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या राजकारणाची तुलना ‘अजगरासारखे’ अशी करत केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर बुधवारी (७ ऑक्टोबर) हॉटेल पॅव्हेलियन येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीच्या निमित्ताने पाटील यांनी मंत्री मुश्रीफ मला खाणार की मी त्‍यांना खाणार चला बघूया, अशा केलेल्या एका मिश्कील वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.

गोकुळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आठ ऑक्टोबरला संपत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बुधवारी सायंकाळी हॉटेल पॅव्हेलियन येथे बैठक झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार शिवाजी पाटील हॉटेल पॅव्हेलियन येथे पोहोचले. त्यांनी बैठक कुठे सुरू आहे, अशी विचारणा केली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे त्यांना बैठकीच्या ठिकाणी घेऊन जात होते. यावेळी रूमबाहेर असलेल्या एका पदाधिकाऱ्याने पाटील यांना बैठकीला मंत्री हसन मुश्रीफही उपस्थित असल्याचे सांगितले.

त्यावर क्षणाचाही विलंब न करता आमदार पाटील यांनी, ‘मुश्रीफ साहेब मला खाणार आहेत की मी त्यांना खाणार आहे? चला, बघूया!’ असे चेष्टेच्या सुरात म्हटले आणि ते बैठकीच्या रूममध्ये दाखल झाले. त्यांच्या या अनपेक्षित वक्तव्याने उपस्थितांना हसू आवरता आले नाही. काही क्षणांसाठी बैठकीतील राजकीय तणावाचा माहोलही हलका झाला. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीकडे गोकुळ निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाने पाहिले जात असतानाच पाटील यांच्या एका वाक्याने बैठकीतील राजकीय चर्चेला वेगळाच रंग भरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news