

गडहिंग्लज : गडहिंग्लज बसस्थानकावर पाच नव्या एसटी बसेसच्या पूजनासाठी आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ एकाच ठिकाणी आले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघांमधील राजकीय वादाची चर्चा रंगली होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी दोन्ही नेते समोरासमोर आल्याने सगळ्यांचेच लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते. दोन्ही नेते अगदी शांतपणे आले; मात्र दोन्ही बाजूंनी आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली आणि काही काळ वातावरण तापले. राष्ट्रवादीकडून व भाजपकडूनही विजयाच्या घोषणा घुमल्या.
अखेर मुश्रीफ यांनीच, ‘आता काही निवडणूक नाही, कशाला घोषणा करताय?’ असा दम भरत कार्यकर्त्यांना शांत केले. नेते शांत; पण कार्यकर्त्यांचा दंगा... त्यामुळे बसस्थानकावरील या कार्यक्रमापेक्षा कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीचीच चर्चा अधिक रंगली! दरम्यान, कार्यकर्त्यांची जरी घोषणाबाजी वाढली असली, तरी दोन्ही नेत्यांनी मात्र अत्यंत संयमाने भूमिका घेत नव्या बसेसचे पूजन केले.
‘गोकुळ’ मोठ्या माणसांचा मोठा विषय
गडहिंग्लज बसस्थानकातील नवीन बसेसच्या पूजनासाठी ज्याप्रमाणे दोन्ही नेते एकत्र आले, त्याप्रमाणे ‘गोकुळ’चे टँकरही एकत्र धावणार का, असा प्रश्न आमदार शिवाजी पाटील यांना विचारल्यानंतर त्यांनी ‘गोकुळ’चा विषय इथे नको. ‘गोकुळ’ हा मोठ्या माणसांचा मोठा विषय असून, मुख्यमंत्री जो निर्णय देतील त्याप्रमाणे आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.