कोल्हापूर : केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेच्या सातव्या फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळाचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवत सर्वाधिक 19 गुणांसह लीग विजेतेपद पटकाविले. तर उत्तरेश्वर तालीम मंडळाने फुलेवाडी क्रीडा मंडळावर 3-2 अशी मात करून सर्वाधिक 18 गुणांसह सीनिअर 8 मधून सुपर सीनिअर 8 मध्ये प्रवेश केला. यावेळी छत्रपती शाहू स्टेडियमवर दोन्ही संघांतील खेळाडूंसह समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. दरम्यान, शनिवारी स्पर्धेचा अखेरचा दिवस असून सायंकाळी 6 वाजता, बक्षीस समारंभाने सांगता होणार आहे.
शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळाने जुना बुधवार संघाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. 18 व्या मिनिटाला संकेत अ. साळोखेच्या कॉर्नरवर संकेत नि. साळोखे याने हेडद्वारे तर 33 व्या मिनिटाला इंद्रजित चौगलेच्या कॉर्नरवर योगेश कदमने हेडद्वारे गोल केला. 43 व्या मिनिटाला संकेत अ. साळोखे याने तिसरा गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात 56 व्या मिनिटाला संकेत नि. साळोखेच्या पासवर करण चव्हाण-बंदरे तर 73 व्या मिनिटाला सिद्धेश साळोखेने गोल नोंदवत आघाडी 5 - 0 अशी भक्कम केली. हाच गोलफरक शेवटपर्यंत कायम राहिला.
उत्तरेश्वरची फुलेवाडीवर 3-2 ने मात
अन्य लढतीत उत्तरेश्वर तालीम मंडळाने फुलेवाडी क्रीडा मंडळाचा 3-2 असा पराभव केला. 6 व्या मिनिटाला ऋषभ पोवारने पहिला तर 25 व्या मिनिटाला नयन सूर्यवंशीने दुसरा गोल केला. उत्तरार्धात फुलेवाडीच्या सिद्धार्थ पाटीलने 47 व्या मिनिटाला पहिल्या गोलची परतफेड केली. 71 व्या मिनिटाला मंगेश दिवसेने दुसरा गोल फेडला. यामुळे सामना 2-2 असा झाला. उत्तरेश्वरच्या अजिंक्य कदमने 73 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला.
शिवाजीच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग
स्पर्धेतील शेवटचा सामना एकतर्फी जिंकून लीग विजेतेपद मिळवताच शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी तिरंगा ध्वजासह मैदानात जल्लोष केला. समर्थकांनीही प्रेक्षक गॅलरीत जयघोष करत जल्लोषात सहभाग घेतला. काही अतिउत्साही समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीतच फटाके वाजविले. यामुळे केएसएच्या आचारसंहितेचा भंग झाला. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर केएसएकडून कारवाई होणार आहे.
साईनाथ स्पोर्टस्, बावडा फुटबॉल क्लब विजयी
दरम्यान, केएसए ‘ब’ गट साखळी स्पर्धेत साईनाथ स्पोर्टस्ने खंडोबा तालीम ‘ब’चा टायब—ेकरवर 4-2 असा पराभव केला. तर दुसर्या सामन्यात बावडा फुटबॉल क्लबने ऋणमुक्तेश्वर तालीमचा 4-1 असा पराभव करून आघाडी मिळविली.