कोल्हापूर : अटीतटीने आणि चुरशीने रंगलेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर या एकमेव गोलची नोंद झाली. यामुळे ‘केएसए’ शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत सलग दुसर्या विजयासह 6 गुणांची कमाई करत शिवाजी मंडळने आगेकूच केली.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारच्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच शिवाजी मंडळ व दिलबहार तालीम यांनी आघाडीसाठी जोरदार चढाया सुरू ठेवल्या. शिवाजीकडून राज अली, संकेत साळोखे, यश जांभळे, रोहन आडनाईक, संकेत जरग, हर्ष जरग, योगेश कदम, अमन सय्यद यांनी आघाडीसाठी लागोपाठ चढाया सुरू ठेवल्या. दिलबहारकडून गंधर्व घाडगे, प्रीतम भोसले, स्वयं साळोखे, सुशांत अतिग्रे सार्थक मगदूम, माणिक पाटील यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले. मात्र, पूर्वार्धात गोल न झाल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
यामुळे उत्तरार्धात सामन्याचा वेग अधिकच वाढला. शिवाजी मंडळाच्या संकेत साळोखेच्या पासवर यश जांभळेने सोपी संधी दवडली, तर संकेत साळोखेने मारलेला फटका दिलबहारचा गोल रक्षक जयकुमारने उत्कृष्टरीत्या रोखला. दिलबहारच्या स्वयं साळोखेच्या पासवर सार्थक मगदूमनची सोपी संधी वाया गेली. पाठोपाठ फेबीननेचीही चढाई फोल ठरली. सामन्याच्या 80 व्या मिनिटाला शिवाजी मंडळकडून झालेल्या खोलवर चढाईत दिलबहारच्या गोलक्षेत्रात सुशांत अतिग्रेकडून हॅण्डबॉल झाला. यामुळे मुख्य पंचांनी पेनल्टी स्ट्रोकचा निर्णय दिला. याचा पुरेपूर फायदा घेत शिवाजी मंडळच्या संकेत साळोखेने बिनचूक गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत गोलची परतफेड न झाल्याने सामना शिवाजी मंडळने एकमेव गोलने जिंकला.
अभिनय बेर्डे यांची उपस्थिती
सामना पाहण्यासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चिरंजीव अभिनेता अभिनय बेर्डे यांनी मैदानात उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन, रोहन स्वामी आदी उपस्थित होते. यावेळी ‘केएसए’च्या पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.