

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पूल ते वाघबीळ या दहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करा, अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्यावर याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामांबाबत आयोजित या आढावा बैठकीत घेण्यात आला.
रत्नागिरी-नागपूर या महामार्गाची भुये, भुयेवाडी, शिये येथील प्रलंबित कामे, चोकाक-अंकली फाटा या मार्गावरील भूसंपादन याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. खासदार धैर्यशील माने यांनी चोकाक ते अंकली पूलदरम्यान बाधित शेतकर्यांच्या भरपाईबाबत, त्यांच्या मागणीप्रमाणे तातडीने निर्णय घ्यावा, असे सांगितले. आमदार अशोकराव माने यांनीही शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. आमदार चंद्रदीप नरके यांनी भुये, भुयेवाडी, शिये परिसरात रस्त्यात बदल केला आहे तर त्याचे चांगले पैसे शेतकर्यांना द्या, अशी मागणी केली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पूल ते वाघबीळ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 20 कोटींचा निधी मंजूर केल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर आ. नरके यांनी आग्रही भूमिका घेत या रस्त्याच्या दुरुस्तीऐवजी हा संपूर्ण रस्ताच नव्याने करून द्या, असे सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कदम यांनी रत्नागिरी-नागपूर महामार्ग खुला झाला की, वाघबीळ ते शिवाजी पूल हा मार्ग राज्य रस्ते महामार्गाकडे वर्ग केला जाणार आहे. यामुळे ‘बी’ पार्ट म्हणून अतिरिक्त मागणी करू, असे सांगितले. त्यालाही आ. नरके यांनी आक्षेप घेत अतिरिक्त मागणी नकोच, या रस्त्याची जबाबदारी तुमचीच आहे, त्यामुळे हा रस्ता तुम्हीच करावा. या रस्त्याची केवळ दुरुस्ती केली, तर त्यावरील 20 कोटी रुपये पाण्यातच जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या रस्त्याबाबत आराखडा तयार करा, अशी सूचना केली. यानंतर बैठकीत या रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला माजी खासदार संजय मंडलिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, भूसंपादन उपजिल्हाधिकारी विवेक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, चंद्रकांत आयरेकर आदींसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
शिवाजी पूल ते वाघबीळ हा रस्ता नंतर हस्तांतरित केला जाणार आहे. म्हणून त्याची जबाबदारी प्राधिकरणाला टाळता येणार नाही. यामुळे हा रस्ता प्राधिकरणानेच करून द्यावा, त्याची जबाबदारी घ्यावी, अशी आग्रही मागणी आ. नरके यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी केली. आता नाही तर परत हा रस्ता होणार नाही. शहरातून पन्हाळा, जोतिबा या ठिकाणी जाणारे पर्यटक, भाविक यांच्यासह ग्रामस्थ, तसेच प्रवाशांची संख्या प्रचंड आहे, त्यांचा विचार करून हा रस्ता झालाच पाहिजे, असे बैठकीत ठणकावून सांगण्यात आले.