

कोल्हापूर : महापालिकेतील सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांमध्ये उडालेल्या जोरदार वादाचे पडसाद आता शहराच्या राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. महापालिकेतील राड्यानंतर अवघ्या काही तासांतच शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख यांच्या समर्थकांनी ऐतिहासिक दसरा चौकात ‘यहाँ के हम सिकंदर...’ या आशयाचे भव्य होर्डिंग लावून उघड शक्तिप्रदर्शन केले आहे. या फलकामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार खमंग चर्चा रंगली आहे.
१ सप्टेंबर राेजी महापालिका आवारात देशमुख आणि राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांच्यात थेट आमनेसामने वाद झाला होता. या वादाचे रूपांतर नंतर तुफान राड्यात झाले. दोघांनीही एकमेकांना अश्लील शिवीगाळ करत बघून घेण्याच्या धमक्या दिल्या आणि भर चौकात येण्याचे उघड आव्हान दिले होते. या हायव्होल्टेज ड्रामामुळे महापालिका परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हा वाद शांत होत नाही तोच ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या समर्थकांनी दसरा चौकात हे वादळी होर्डिंग झळकवले आहे. ‘यहाँ के हम सिकंदर’ या सूचक शीर्षकामुळे हा फरास यांच्या आव्हानाला दिलेला थेट राजकीय टोला मानला जात असून, या होर्डिंगने शहरात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.