

कोल्हापूर : वाद्यांचा दणदणाट... रंगीबेरंगी विद्युत रोषणाई... लेसरचा झगमगाट... डान्स ग्रुपच्या नृत्यावर थिरकणारी तरुणाई... तरुणाईचा सळाळता उत्साह... सुमारे चार तास उसळलेली गर्दी... अशा जल्लोषी वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेच्या भगव्या दहीहंडीचे शिरोळमधील श्री जय हनुमान तालीम मानकरी ठरले. उत्कंठा वाढवणारी सुमारे 40 फूट उंचीवरील दहीहंडी गोविंदा मयूर गावडे याने सातव्या थरावरून फोडताच एकच जल्लोष झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते जय हनुमान तालीमी मंडळाच्या गोविंदा पथकाला एक लाख रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवी दहीहंडी बांधण्यात आली होती. राजेश क्षीरसागर व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन झाले. युवा सेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.
मुंबईतील डान्स ग्रुपने उपस्थित तरूणाईला विविध गाणी सादर करत नृत्यावर थिरकवले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कपिल केसरकर, अध्यक्ष गणेश काकडे, राहुल अपराध, अवधूत अपराध, आशिष पिठलिया, संजय देवरूमठ, मयूर देसाई, करण इंगवले, दर्शन ओसवाल, ईशान परमार आदींनी संयोजन केले.
कोल्हापुरात आयटी पार्क नसल्याने तरुणांना मुंबई, पुणे, बंगळूर आदी ठिकाणी जावे लागत आहे. मात्र येत्या काळात कोल्हापुरात आयटी पार्क स्थापन करू. त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोल्हापुरातील तरुणांना लवकरच चांगली बातमी मिळेल. तसेच कोल्हापूर शहराची हद्दवाढही लवकरच केली जाईल, असे आ. राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.