

कोल्हापूर : पालकमंत्री एका जुगार क्लब अन् मटकेवाल्याला सोबत घेऊन फिरतात. दोन नंबर धंदेवाल्यांशी त्यांचे साटेलोटे आहे का? असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यातून पालकमंत्र्यांचीच बदनामी होत आहे. त्यामुळे संबंधिताला पालकमंत्र्यांनी घेऊन फिरू नये, अन्यथा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यासोबतचा त्यांचा फोटो त्यांना स्पीड पोस्टने पाठवणार, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित जुगार क्लब व मटकेवाल्यावर पोलिसांत किती गुन्हे आहेत? तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जिल्हाप्रमुख इंगवले यांनी त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल नसल्याचे सांगितले. मात्र, दुसर्याच्या आडून ते दोन नंबर धंदे करतात. त्या जुगार क्लबवाल्याने महापालिका निवडणूक लढविली, तर घरोघरी पत्याचे कॅट वाटणार, असेही इंगवले यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गटात आमिष दाखवूनच दोन नंबर धंदे करणार्यांची भरती केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पक्षनिष्ठेचे फळ म्हणून आपल्याला जिल्हाप्रमुखपद मिळाल्याचे सांगून इंगवले म्हणाले, मला विधानसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणून मी कधी नाराज झालो नाही. पक्षविरोधी भूमिका घेतली नाही. नाराजीच्या घटना शिवसेनेला नव्या नाहीत. संजय पवार नाराज असतील; पण पक्षश्रेष्ठी त्यांची समजूत काढतील. गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन बळकट करणार. घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शाखा काढणार. ठाकरे सेना कुणाच्याही दावणीला बांधू देणार नाही. सेनेला पुनर्वैभव आणून दाखवू. महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या किमान 15 जागा जिंकू, असा विश्वासही इंगवले यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, रवी चौगुले, विशाल देवकुले, राजू जाधव आदींसह इतर उपस्थित होते.