

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटात जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या निवडीवरून सुरू असलेली धुसफूस अद्याप सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्टला पवार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकार्यांना ‘मातोश्री’वर येण्याचे आदेश आले आहेत. उपनेते संजय पवार यांच्यासह इतर पदाधिकार्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता इंगवले यांचे पंख कापले जाणार असल्याची चर्चा आहे.
जिल्हाप्रमुख पदासाठी इंगवले यांच्यासह अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, विराज पाटील, राजू यादव हे इच्छुक होते. त्यापैकी पक्षश्रेष्ठींनी इंगवले यांचे जिल्हाप्रमुखपदासाठी नाव निश्चित केले; मात्र उपनेते पवार यांच्यासह इतर इच्छुक आणि पदाधिकार्यांनी इंगवले यांच्या नावाला विरोध दर्शवून तीव्र नाराजी व्यक्त केली. पवार यांनी तर उपनेतेपदाचा राजीनामा दिला. सुर्वे यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. इतरही पदाधिकार्यांची नाराजी अद्याप कायम आहे. त्याचा पक्षाच्या बांधणीवर परिणार होत असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.
सद्यस्थितीत इंगवले यांच्याकडे कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुखपद आहे. त्यापैकी फक्त कोल्हापूर उत्तरसाठी इंगवले यांना जिल्हाप्रमुख केले जाणार असल्याचे समजते. कोल्हापूर दक्षिण आणि करवीरसाठी जिल्हाप्रमुख म्हणून विराज पाटील यांची, तर कोल्हापूर दक्षिणचे शहरप्रमुख म्हणून अवधूत साळोखे यांची निवड करायची. कोल्हापूर उत्तर शहप्रमुख म्हणून सुनील मोदी यांच्याकडे आहे. कोल्हापूर व सांगलीसाठी संघटक म्हणून नवेज मुल्ला यांना, तर संजय पवार यांना राज्य पातळीवर संधी दिली जाणार आहे अशी चर्चा शिवसैनिकांत सुरू आहे.