

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 13 पैकी 4 नगरपालिकांवर भगवा फडकवून शिवसेनेने अव्वल स्थान मिळविले आहे, तर भाजपने त्याखालोखाल तीन नगरपालिका जिंकून दुसरे स्थान मिळविले आहे. एकेकाळी जिल्ह्यावर राज्य करणार्या काँग्रेस, राष्ट्रवादीला जनतेने तिसर्या स्थानावर नेऊन ठेवले असून, जनसुराज्य शक्तीला दोन नगराध्यक्ष मिळाल्याने विधानसभेपाठोपाठ त्यांना मिळालेले यशही घवघवीतच म्हणावे लागेल.
राज्याच्या राजकारणाची फेरमांडणी झाल्यानंतर जिल्ह्यातही राजकारणाची फेरमांडणी झाली असून, मैत्रीचे जुळलेले धागे तोडून तुटलेले धागे जोडण्यात आले आहेत. एकेकाळी महापालिका व नगरपालिकांच्या सत्ता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या हाती होत्या. मात्र, आता त्यांना जनतेने तिसर्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. राष्ट्रवादी महायुतीचा घटक आहे; पण काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही.
पन्हाळ्यात विनय कोरेंची बाजी; मात्र तटबंदीला भगदाड
पन्हाळ्यात विनय कोरे यांनी बाजी मारली आहे. मात्र, येथे त्यांना एकहाती यश मिळविता आले नाही. सत्तेत नवे वाटेकरी आले आहेत. जनसुराज्य शक्तीच्या जयश्री पोवार नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या असून, त्यांचे 14 सदस्य विजयी झाले आहेत. भाजपने पन्हाळ्यात 2 जागांवर यश मिळविले आहे. 4 अपक्षांनी बाजी मारली. हे कोरे यांना मिळालेले आव्हान असून, कोरे यांच्या आजवरच्या अभेद्य तटबंदीला भगदाड पडले आहे.
मलकापुरात कोरेंचा दबदबा कायम
मलकापूरला विनय कोरे यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. तेथे नगराध्यक्षपदासह 11 जागा जनसुराज्य शक्तीने जिंकल्या असून, भाजपला 1 जागा मिळाली आहे. ठाकरे शिवसेनेला 7 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानीला खातेही उघडता आले नाही. येथे नगराध्यक्षपदी रश्मी कोठावळे या विजयी झाल्या आहेत.
गडहिंग्लजला जनता दल-भाजप युती नाकारली; मुश्रीफ यांनी वर्चस्व ठेवले
गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दलाने भाजपबरोबर केलेली युती जनतेने सपशेल फेटाळली आहे. हसन मुश्रीफ यांच्या हाती जनतेने कारभार सोपविला आहे. तेथे मुश्रीफ यांना एकटे पाडण्यात जनसुराज्य शक्ती पक्षानेही जनता दल-भाजपला साथ दिली होती. मात्र, नगराध्यक्षपद व 17 जागा राष्ट्रवादीला दिल्या आहेत. नगरपालिकेत सत्ता गाजविणार्या जनता दलाला केवळ तीन जागांवर यश मिळाले असून, जनसुराज्य व भाजपला एक जागा मिळाली आहे. तेथे नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेश तुरबतमठ निवडून आले आहेत.
आजर्यात विखुरलेल्या विरोधकांचा अशोक चराटींना फायदा
आजर्यात अशोक चराटी हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत, तर त्यांच्या ताराराणी आघाडीचे 8 सदस्य विजयी झाले आहेत. चराटी यांच्याबरोबर जाण्यास मुकुंदराव देसाई यांनी असमर्थता दाखविली व विरोधक विखुरले. त्याचा फायदा चराटी यांना झाला आहे. महाविकास आघाडीत विसंगती होती. नेत्यांनी जेवढे लक्ष द्यायला पाहिजे होते, ते दिले नाही. त्यामुळे ताकद असूनही त्यांनी नगरपालिकेची सत्ता गमावली.
चंदगडला आमदारांचा डंका; दोन्ही राष्ट्रवादींना नाकारले
चंदगडला भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांना रोखण्यासाठी व विधानसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी अजित पवार व शरद पवार राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने एकी केली होती. मात्र, भाजपने शेवटच्या क्षणी केलेली शिवसेनेशी युती आ. पाटील यांना सत्तेपर्यंत नेण्यात यशस्वी ठरली. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभेचा फायदा झाला. सुनील काणेकर हे भाजप उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. या तालुक्यात ठाकरे शिवसेनेची ताकद असतानाही त्यांना त्याचा उपयोग करता आला नाही. 17 पैकी 8 नगरसेवक भाजपचे आहेत.
कुरुंदवाडला यड्रावकरांचे यश
कुरुंदवाडला राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मनीषा उदय डांगे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. येथे ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेनेने आघाडी केली होती. त्यांना 12 जागांवर यश मिळाले आहे, तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला नगराध्यक्षपद व सत्ता टिकविता आली नाही.
पेठवडगावला पुन्हा ‘यादव पॅटर्न’
पेठवडगाव नगरपालिकेत यादव गटाच्या प्रमुख सौ. विद्याताई पोळ यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडीत बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदासह 15 जागांवर मिळविलेला विजय यादव गटासाठी खुप मोठा आहे. जनसुराज्य शक्ती व ताराराणी युवक क्रांती आघाडीला केवळ 5 जागा मिळाल्या. जनसुराज्यने मतदारसंघात ताकद देऊनही त्यांना त्याचा फायदा उठविता आला नाही. काहीकाळ वडगावची सत्ता आपल्याकडे कायम राखणार्या सालपे गटाच्या प्रमुख प्रविता सालपे यांचाही नगराध्यक्ष निवडीत पराभव झाला.
शिरोळमध्ये यड्रावकर, माने यांना धक्का
शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर व आमदार अशोकराव माने यांना घेरण्यात विरोधकांना यश मिळाले आहे. येथील पराभवाने त्यांना धक्का दिला आहे. पृथ्वीराज यादव गटाच्या योगीता कांबळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. शिवसेनाप्रणित शाहू आघाडी व भाजपप्रणित ताराराणी आघाडीत फूट पडल्याने त्यांना त्याची किंमत मोजावी लागली आहे. यादव गटाचे 15 सदस्य विजयी झाले आहेत, तर यड्रावकर गटाच्या राजर्षी शाहू आघाडीला 3, तर 2 अपक्ष विजयी झाले आहेत. गणपतराव पाटील व राजू शेट्टी यांचा या यशात मोठा वाटा आहे.
हुपरीत आवाडे यांचा करिश्मा
हुपरी नगरपालिकेत भाजप आमदार राहुल आवाडे यांनी आपला करिश्मा दाखविला आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे मंगलराव माळगे विजयी झाले आहेत. तेथे भाजप-शिवसेना युती होती. भाजपला 15, तर शिवसेनेला 4 जागा मिळाल्या आहेत. मनसेने दोन जागा मिळून खाते उघडले आहे. अंबाबाई विकास आघाडी, काँग्रेस व ठाकरे शिवसेनेचा पराभव झाला आहे.
हातकणंगलेत खासदार धैर्यशील माने, डॉ. मिणचेकर यांना यश
हातकणंगलेत दोन्ही शिवसेना, काँग्रेस, भाजप व अजित पवार राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अजितसिंह पाटील निवडून आले. शिवसेनेला 5 जागांवर, काँग्रेसला 5 जागांवर, भाजपला दोन जागांवर, तर तीन अपक्षांना जनतेने संधी दिली आहे. येथे खासदार धैर्यशील माने व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेनेचा किल्ला लढविला होता.
मुरगूडला मंडलिकच ‘कारभारी’; पालकमंत्री आबिटकरांची साथ मोलाची
कागलच्या पराभवाचा वचपा संजय मंडलिक यांनी मुरगूडमध्ये काढला आहे. आपली साथ सोडून गेलेल्या राजेखान जमादार यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी इशारा दिला आहे. दुसर्या पिढीतही मंडलिकच मुरगूडचे कारभारी असल्याचे सिद्ध झाले आहे. मंडलिक गटातून जमादार यांनी मुश्रीफ गटात प्रवेश करत पत्नी तस्नीम यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवून दिली होती, तर प्रवीणसिंह पाटील यांनी मुश्रीफ गटातून मंडलिक गटात प्रवेश करून पत्नी सौ. सुहासिनी यांना उमेदवारी दिली होती. त्या विजयी झाल्या, तर शिवसेनेला 16 जागा मिळाल्या आहेत. मुश्रीफ-घाटगे गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुश्रीफ यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची मंडलिक यांना मोलाची साथ मिळाली.
जयसिंगपूरला यड्रावकरांची बाजी; विरोधकांचे ऐक्य पटले नाही
आमदर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना घेरण्यासाठी विरोधक एकत्र आले. मात्र, त्यांचे हे ऐक्य जनतेला पटले नाही. नगराध्यक्षपदी संजय पाटील-यड्रावकर हे विजयी झाले आहेत. शाहू विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह 21 जागांवर विजय मिळविला आहे, तर एकत्र येऊनही विरोधी आघाडीला केवळ 5 जागा मिळाल्या असून, एक जागा अपक्षाने जिंकली आहे.
कागलच्या मुश्रीफ-घाटगे युतीला जनतेचा आशीर्वाद
जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असलेल्या कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी कट्टर राजकीय वैर विसरून युती केली होती. जनतेला याबाबत विश्वासात न घेतल्याबद्दल जनतेची माफीही मागितली होती. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व जागांवर मुश्रीफ-घाटगे युतीला जनतेने स्वीकारले आहे. मंडलिक गटाला कागलमध्ये भोपळाही फोडता आला नाही. मुश्रीफ यांचे सहकारी प्रताप माने यांच्या पत्नी सविता या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. आता घाटगे यांच्यासाठी पुढे कोणती संधी मिळणार हे पाहावे लागेल. कारण, 2029 पर्यंत आता कोणतीही सार्वजनिक निवडणूक नाही. ज्यांनी मुश्रीफ-घाटगे युती घडवून आणली, ते आता घाटगे यांच्यासाठी कोणते सत्तेचे महाद्वार उघडणार यांची त्यांच्या समर्थकांना उत्सुकता आहे.