

कोल्हापूर : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्या सोमवारी होणाऱ्या महामेळाव्यास कर्नाटक सरकारने परवानगी दिली नाही. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांवर दडपशाही करून त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्नाटक सरकार विरोधी तीव्र निदर्शने करीत कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस रोखल्या. यामुळे बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. कर्नाटकच्या बस रोखून त्यावर ‘जय महाराष्ट्र’ असे फलक चिकटविण्यात आले.
यावेळी संतप्त शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. संतप्त शिवसैनिकांनी कोल्हापूर एस.टी. जिल्हा नियंत्रक यांना कर्नाटक बस वाहतूक बंद करावी, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा नियंत्रकांनी वरिष्ठांशी बोलून निर्णण घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, यांनी कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री यांनी मराठी जनतेची माफी मागावी, अन्यथा आज आम्ही कर्नाटक बस बंद पाडली. येणाऱ्या काळात कर्नाटक सरकारमधील मंत्र्याना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार, अवधूत साळोखे, मंजीत माने, चंद्रकांत भोसले, अनिकेत घोटणे, दिनमहमंद शेख, संजय जाधव, संतोष रेडेकर, पंपू कोंडेकर, गोविंद वाघमारे आदी सहभागी झाले होते. मराठी भाषिकाचा मेळाव्यास कर्नाटक सरकारने परवानगी दिली नाही, तसेच महाराष्ट्रातील मराठी माणसाला बेळगावात प्रवेश दिला गेला नाही. याचे पडसाद राज्यभर उमटले.