

सतीश सरीकर
कोल्हापूर : सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे शिवसैनिक. सामान्यांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे पदाधिकारी. पण, पक्षांतर्गत स्वतःवरच कितीही अन्याय झाला, तरी तोंड उघडायचे नाही, हा शिवसेनेतील अलिखित नियम, का? तर पक्षाचा आदेश हाच सर्वश्रेष्ठ. परिणामी, अनेक पदाधिकारी अक्षरशः मनात खदखद घेऊन पक्षाचे काम करत आहेत; मात्र आता आणखी किती सहन करायचे? असे म्हणत अनेक दिवस दबक्या आवाजात सुरू असलेल्या नाराजीने आता टोक गाठले.
कोल्हापुरातील पदाधिकार्यांनी ठाकरे गट शिवसेनेतील खदखदीला अखेर तोंड फोडले. हतबल झालेल्या उपनेते संजय पवार यांनी मौन सोडले, तर हर्षल सुर्वे यांनी थेट पक्षाचाच राजीनामा देऊन वरिष्ठांकडून होणार्या कुरघोडीच्या राजकारणाविषयी संताप व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदासाठी मुंबईतून रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आली आणि अनेक निष्ठावंतांची नाराजी शिगेला पोहोचली. शिवसैनिकांची ही नाराजी आता केवळ अंतर्गत चर्चेपुरती मर्यादित राहील, असे वाटत नाही. ‘बाहेरून आलेल्या लोकांवर विश्वास आणि निष्ठावंतावर अविश्वास’ अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. पक्षाकडून यावर तत्काळ आणि सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर पक्षात अनेक हर्षल सुर्वे तयार होतील. संजय पवार यांच्यासारखे जुने नेते बंडाचे निशाण हाती घेतील. जिल्ह्यातील शिवसेनेने अनेक कठीण परिस्थितीतून मार्ग काढला आहे. मात्र, आताचा संघर्ष हा बाह्य नसून अंतर्गत आहे. पक्षातील कार्यपद्धती, निवड प्रक्रिया, कार्यकर्त्यांचा सन्मान या सगळ्यांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, ‘शिवसेना’ हे नाव उरले तरी त्यामागची निष्ठा, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनसामान्यांतील विश्वास हरवण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी चर्चा शिवसैनिकांत आहे.
गेल्या अनेक वर्षांत शिवसेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणारे, आंदोलन करणारे आणि स्थानिक पातळीवर पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवणारे कार्यकर्ते महत्त्वाचे मानले जात होते. त्यामुळे शिवसेनेत कार्यकर्त्यांचे मत सर्वश्रेष्ठ मानले जात होते. शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुखांपर्यंत सर्वच निर्णय कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने घेतले जात होते. मात्र, आता एकतर्फी निर्णय लादले जात असल्याचा आरोप शिवसैनिकांतून होऊ लागला आहे. दगड झेलले आम्ही... हार घेणार दुसरे... अशी अवस्था झाली आहे. ‘आम्ही रस्त्यावर उतरलो, आंदोलने केली, विरोधकांशी झुंज दिली...’ पण, निवडीच्यावेळी आमचा उल्लेख होत नाही. शिवसेना आता ‘नेत्यांकडून आदेश घ्या, फक्त तेच करा’ अशा स्वरूपात चालली आहे. फक्त आदेशामुळे कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनाच शून्य किंमत आली असल्याने शिवसैनिकांत असंतोष पसरत असल्याचे एका शिवसैनिकाने सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुर्वे यांनी थेट राजीनामा पत्र पाठविले आहे. त्यात जिल्हाप्रमुखपदी निवड झाली नाही. त्यामुळे मी खदखद व्यक्त केली. मात्र, आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, तीच जास्त जिव्हारी लागली. आजपर्यंत आदेश मानूनच काम केले होते. कधीही आदेश डावलला नाही; पण आता आदित्य ठाकरे यांचा आदेश आला, निर्णय मान्य नसेल तर निघून जावा. जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड मला मान्य नाही. त्यामुळे मी पक्षातून निघत आहे. मी माझ्या पदाचा आणि सक्रिय सभासदाचा राजीनामा देत आहे, असे पत्रात म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी संपर्क नेते विनायक राऊत यांच्यासह इतरांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही. वास्तविक जिल्हाप्रमुख पदासाठी उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, तालुकाप्रमुख विराज पाटील व राजू यादव इच्छुक होते. उपनेते असल्याने ते माझ्याशी बोलत होते. तसेच राऊत यांनी त्यांना पक्षप्रमुखांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अचानक इंगवले यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड जाहीर केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इंगवले यांची विश्वासार्हता अन् पारदर्शकता बघण्याची विनंती करणार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.