kolhapur | शिवसेना, भाजपची मनपासाठी स्वबळाची तयारी

महाविकास आघाडीतही बेबनावाला सुरुवात; काँग्रेस, ठाकरे शिवसेनेत उभा दावा
Kolhapur Municipal Election
कोल्हापूर महापालिका Pudhari File Photo
Published on
Updated on

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : चार सदस्यांचा एक प्रभाग, अशी मतदारसंघांची रचना असल्याने प्रत्येक पक्षाला संधी मिळेल व महायुती आणि महाविकास आघाडी असाच कोल्हापूर महापालिकेसाठी सामना होईल, असे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला वाटत असतानाच, दोन्ही घटकपक्षांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. अर्थात, नेत्यांकडून निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाला जागावाटपात जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात. मात्र, महायुतीत शिवसेना, भाजपमध्ये जागावाटपाचा जो छुपा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे तो पाहता या दोन पक्षांना एकत्र आणण्यात नेत्यांची कसोटी लागणार आहे. काँग्रेस व ठाकरे शिवसेनेतील नेत्यांमध्ये अक्षरश: उभा दावा आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी वाट पाहत आहेत.

महापालिकेत 81 सदस्यांसाठी 20 प्रभाग निश्चित केले आहेत. प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडून द्यायचे आहेत. यामुळे जेथे एकास एक लढत आहे, तेथे महायुती होणे काहीसे अवघड दिसते; पण कोल्हापूर महापालिकेत एका प्रभागातून चार जागा लढवायच्या असल्याने तेथे प्रत्येक पक्षाला न्याय मिळणार असल्याने तेथे युती सहजशक्य वाटत असल्याने महायुतीच्या नेत्यांचेच वक्तव्य होते. वरवर हे सगळे सोपे आहे, असे वाटत असतानाच निवडणूक जवळ येईल तसे हे अवघड होत आहे.

शिवसेनेचा भगवा फडकावण्याचा निर्धार

शिवसेनेने कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कोल्हापूर उत्तरचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे, त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. विसर्जित महापालिकेत शिवसेनेचे 4 सदस्य असताना शिवसेना सत्तेत होती. भाजपच्या आक्रमक भूमिकेने शिवसेना सुरुवातीपासून सावध भूमिकेत आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये 9, तर 5 प्रभाग हे उत्तर दक्षिणमध्ये आहेत. महायुतीतील दोन्ही पक्षांसाठी महापालिकेवरील वर्चस्व हे प्रतिष्ठेचे आहे. 2029 च्या विधानसभेची गणिते यावरच अवलंबून असल्याने शिवसेना टोकाला जाऊन लढाई लढणार आहे.

भाजपची टीम कार्यरत

भाजपने कोल्हापूर महापालिकेसाठी सर्व्हे केला आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजपने 81 पैकी 34 जागांची मागणी केली आहे. त्यावर ते ठाम आहेत. पूर्वीच्या सभागृहात भाजपचे 13, तर महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे 19 सदस्य होते. आता महाडिक हे भाजपमध्ये असल्याने भाजपने त्यांच्या 19 जागा आपल्याबरोबर गृहीत धरून 34 जागांची मागणी केली आहे. 81 पैकी भाजपला 34 जागा दिल्या; तर शिवसेना व राष्ट्रवादीला किती जागा मिळणार, हा प्रश्नच आहे. भाजपची पडद्यामागील अद़ृश्य टीम कार्यरत झाली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये महापालिकेचे 6 प्रभाग आहेत, तर 5 प्रभाग उत्तर दक्षिणमध्ये संमिश्र आहेत. तेथे भाजपचे अमल महाडिक आमदार आहेत. भाजप टोकाला जाऊन आपल्याला अपेक्षित जागा पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे.

आजवर मनपात काँग्रेसच दादा

महापालिकेवर काँगे्रसचे वर्चस्व राहिले आहे. गत महापालिकेत 81 पैकी 30 जागा जिंकून काँग्रेसने आपणच दादा असल्याचे सिद्ध केले होते. पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढल्या नसल्या, तरी वर्चस्व काँग्रेस नेत्यांचेच राहिले. श्रीपतराव बोंद्रे, उदयसिंगराव गायकवाड यांनी काही वर्षे वर्चस्व राखले. नंतरच्या काळात 1991 पासून महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीकडे सूत्रे आली. मात्र, बहुतांशी सदस्य काँग्रेसचे होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या सत्तेच्या वर्चस्वाला शह दिला. मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच ‘गोकुळ’ व कोल्हापूर महापालिकेची सूत्रे काँग्रेस कमिटीतून हलतील, असे जाहीर केले. त्यानंतर महापालिकेतील ताराराणी आघाडीचे वर्चस्व संपले. काँग्रेसचे 30 सदस्य होते. राष्ट्रवादीच्या 15 व शिवसेनेच्या 4 सदस्यांसोबत महाविकास आघाडी सत्तेत आली. या बळावर कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने आमदार घडविला. पोटनिवडणुकीतही जागा कायम राखली.

ठाकरे शिवसेनेचे काँग्रेसला आव्हान

ठाकरे शिवसेनेने जोरदारपणे दंड थोपटले आहेत. मुळात शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात सख्य नाही. महाविकास आघाडी म्हणून राज्य पातळीवरून काय निर्णय होणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. विसर्जित महापालिकेत एकत्रित शिवसेनेच्या 4 जागा असल्या, तरी आता मात्र त्यांनी 35 ते 40 जागांची मागणी केली आहे. गत कोल्हापूर लोकसभेला शिवसेनेकडे खासदार पद व कोल्हापूर उत्तरचे आमदार पदही होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने काँग्रेसला प्रामाणिकपणे मदत केली असून, त्याची जाणीव ठेवून काँग्रेसने प्रत्येकवेळी शिवसेनेला गृहीत धरण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीत मुश्रीफ सांगतील ते...

विसर्जित महापालिकेत एकत्रित राष्ट्रवादीचे 15 सदस्य होते. मात्र, सध्याची राष्ट्रवादीची अवस्था ही हसन मुश्रीफ सांगतील ती दिशा अशीच आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मुश्रीफ हे एकमेव आमदार आणि तेच नेते आहेत. शहराध्यक्ष आदिल फरास आहेत. संघटना बांधणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती पुढे आहे, हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मुश्रीफ यांच्याशी निष्ठावंत असलेल्या दहा नगरसेवकांवर राष्ट्रवादीची भिस्त आहे.

शरद पवार राष्ट्रवादीत निष्ठावंतांना स्थान

शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहणार्‍या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तगड्या उमेदवाराच्या विरोधासाठी बाहेरचा उमेदवार आयात केला जाणार नाही. 81 जागांसाठी आतापर्यंत 30 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. स्वबळावर न लढता इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news