

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय...’ अशा घोषणा, ढोल-ताशा, झांज व लेझीम पथकांचा खणखणाट, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लाईट व साऊंड सिस्टीमचा दणदणाट आणि आबालवृद्ध शिवप्रेमींचा उत्साही सहभाग अशा वातावरणात मंगळवारी पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक (तिथीनुसार) शिवजयंती सोहळ्यानिमित्त गेला आठवडाभर ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक, आरोग्यदायी उपक्रमांचे आयोजन तालीम संस्था, तरुण मंडळांच्या वतीने करण्यात आले.
शहर-उपनगरे आणि आसपाच्या ग्रामीण भागातील तालीम मंडळांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संयुक्त मंगळवार पेठ, संयुक्त उत्तरेश्वर पेठ, संयुक्त खंडोबा तालीम, घिसाड गल्ली तरुण मंडळ, कनाननगर मित्र मंडळ, संयुक्त पाचगाव शिवजयंती उत्सव मंडळ, छत्रपती चौक, गंजीमाळ, फाईट क्लब सोमवार पेठ, मराठा वॉरिअर शाहूपुरी, धर्मवीर मंडळ यासह विविध मंडळांचा समावेश होता.
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या मिरवणुकीत छत्रपती शिवराय, रणरागिणी ताराबाई व मावळ्यांच्या वेशभूषेतील युवक-युवती घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच करवीरनिवासिनी अंबाबाईची प्रतिकृती मिरवणुकीत होती. शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकेही झाली. संयुक्त पाचगावच्या मिरवणुकीचा मार्ग संभाजीनगर, न्यू महाद्वार रोड, खरी कॉर्नरवरून बिनखांबी गणेश मंदिराच्या चौकात आली. संयुक्त गंजीमाळच्या मिरवणुकीत कार्यकर्ते ध्वज फिरवत साऊंड सिस्टीमवर लावलेल्या गाण्यांवर थिरकले. महाराणा प्रताप चौकातील घिसाड गल्लीतर्फे महाराणा प्रताप चौकातून मिरवणुकीस सुरुवात झाली. बिंदू चौक, राजर्षी शाहू खासबाग मैदानमार्गे ही मिरवणूक मिरजकर तिकटी येथे आली. महाराणा प्रताप यांची प्रतिमा, सिंहासनाधिष्ठित शिवछत्रपतींचा आकर्षक फुलांनी सजविलेला पुतळा मिरवणुकीत होता. छत्रपती चौकाच्या मिरवणुकीत सिंहासनाधिष्ठित पुतळा होता. शाहूपुरीतील मराठा वॉरिअर्सच्या मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणेवर मराठी इतिहासावर आधारित गाणी लावण्यात आली होती. कारवान बॉईज, फाईट क्लब, धर्मवीर योद्धा मंडळ व संयुक्त कनाननगरचे कार्यकर्ते जल्लोष करत मिरजकर तिकटी येथे आले होते. संयुक्त कनाननगरच्या मिरवणुकीत शिवछत्रपतींचा पुतळा रथामध्ये ठेवण्यात आला होता.
महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांची मूर्ती मिरवणुकीत सहभागी करण्यात आली होती. आकर्षक सजावट,विद्युत रोषणाई करण्यात आली होती. साऊंड सिस्टीमच्या तालावर तरुणाई उत्साहाने नाचत होती. महाराणा प्रताप चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडे मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली.
‘शिक बाई शिक, लढायला शिक, जिजाऊ लेकी लढायला शिक’ या आणि विविध स्फूर्ती गीतांतून शाहिरांनी उपस्थितांमध्ये स्फुलिंग चेतविले. संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित शिवजयंती उत्सवाचा समारोप शाहीर दिलीप सावंत आणि सहकार्यांच्या पोवाड्यांनी झाला. शाहीर दिलीप सावंत यांनी शिवजन्म काळ पोवाडा, शिवमंगल गीत, शेतकरी गीत, महाराष्ट्र गीत, मराठा स्फूर्ती गीत, शिवराज्याभिषेक गीत, अफझल खान वध पोवाडा आदींसह विविध कवणे सादर करून उपस्थितांना प्रेरणा दिली. शाहीर तृप्ती सावंत यांनी ‘शिक बाई शिक, लढायला शिक जिजाउच्या लेकी लढायला शिक’ हे स्फूर्ती गीत सादर करून उपस्थित महिला व युवतींची मने जिंकली. यावेळी शाहीर दिलीप सावंत यांच्यासोबत भगवान आंबले, रत्नाकर कांबळे, मारुती रणदिवे, सुदर्शन ढाले, योगेश गुरव आदी सहकार्यांनी आपल्या कलेने उपस्थितांना खिळवून ठेवले. शाहिरी गीत सादर झाल्यावर रात्री साडेआठ वाजता पुण्यातील सप्तशृंगी प्रॉडक्शनने ‘वाघनखं’ हे नाटक सादर केले. या नाटकासही उपस्थितांनी दाद दिली. यावेळी संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समितीचेपदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंतीच्या उत्सवात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. रांगोळी रेखाटणे, पाळणा सजवणे, पाळणा हलवणे याबरोबरच पेठांमधून निघालेल्या मिरवणुकीत शिवरायांचा अखंड जयघोष करत, पारंपरिक पेहरावात महिला फार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे, या महिला शिवरायांच्या रथाबरोबर जयजयकाराच्या घोषणा देत चालत होत्या.
साऊंड सिस्टीम दणदणाटातही पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता. लेझीम पथके, धनगरी ढोल यासह कडाडणार्या कोल्हापूरच्या हलगीने मिरवणुकीत चैतन्य आणले. लेझीम पथके मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अनेकांनी त्यावर ठेका धरला.
मध्यरात्र उलटून गेली, तरीही मिरजकर तिकटीपासून पापाची तिकटीपर्यंत मिरवणुकीतील विद्युत रोषणाईचा लखलखाट सुरू होता. सजवलेल्या रथातील शिवप्रतिमांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरतीही करण्यात आली. पेठांपेठांमधून निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी शिवरायांच्या रथासमोर पाणी घालून आरती करून साखर वाटप करत मिरवणुकीचे स्वागत केले.