

शिरोली एमआयडीसी : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे शिरोली विकास संस्थेच्या पाणीपुरवठा विभागातील जॅकवेलमध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मोटरचे बॉक्स फोडून सुमारे 30 हजार रुपयांचे तांब्याच्या पट्ट्या व मेन स्विचसह साहित्य लंपास केले.
गेल्या एका वर्षात या जॅकवेलमध्ये तिसऱ्यांदा चोरी झाली असून, याआधीही एकूण 1 लाखाहून अधिक किमतीचे तांबे व इलेक्ट्रिक साहित्य येथे चोरीस गेले आहे. मात्र पोलिसांना अद्याप या चोरट्यांचा तपास लावता आलेला नाही.
परिसरातील शेतकरीही चोरीच्या घटनांमुळे हैराण झाले आहेत. नदीकाठावरील शेतकरी गुंडा ममुलाल सांनदे यांची 5 HP सबमर्सिबल मोटर काही दिवसांपूर्वीच पाण्यातून काढून चोरी करण्याचा प्रसंग घडला. तसेच महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरवरही चोरट्यांनी हात साफ करत सुमारे 1 लाख किमतीचे तांब्याचे वायर चोरून नेले. याशिवाय पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेची केबल व इलेक्ट्रिक साहित्य यापूर्वी चोरीस गेले आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करून या चोरट्यांना अटक करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.