

Kolhapur News
नागाव : शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी रात्री एका कंपनीत हिट ट्रीटमेंट भट्टीचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत इंगरूळ (ता. शिराळा) येथील एका ३८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण परिसर हादरून गेला. राहुल मुकुंद कांबळे (वय ३८, रा. इंगरूळ, ता. शिराळा, जि. सांगली) असे मृत कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कांबळे हा गेल्या सहा वर्षांपासून शिरोली एमआयडीसीमधील 'श्रीराम इंडस्ट्रीज' या कंपनीत कार्यरत होता. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास राहुल अन्य तीन सहकाऱ्यांसह कंपनीत काम करत होता. याच दरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला. वीज गेल्याच्या काही वेळातच हिट ट्रीटमेंटच्या भट्टीचा मोठा आवाज होऊन भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या तडाख्यात राहुल सापडल्याने त्याचा जागीच अंत झाला.
स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या कंपन्यांमधील कामगारही भीतीपोटी बाहेर आले. घटनेची माहिती मिळताच कंपनी मालकांनी तातडीने धाव घेतली आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात (सीपीआर) पाठविला आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत. राहुलच्या अकाली निधनाने त्याच्या मूळ गावी इंगरूळ येथे शोककळा पसरली आहे.