

Shirol sugarcane protest
जयसिंगपूर : उसाच्या वाढीव दरासाठी शिरोळ तालुक्यात सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक चिघळत चालले आहे. कोल्हापुरात ऊस दरावर झालेला तोडगा शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि 'आंदोलन अंकुश' संघटनेने पूर्णपणे अमान्य केला आहे. तालुक्यांतील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊस तोडी शेतकऱ्यांनी नाकारल्या असतानाही, काही कारखान्यांनी दबाव आणून बळजबरीने ऊस तोडी सुरू ठेवल्या होत्या. या जबरदस्तीच्या ऊस तोडी 'आंदोलन अंकुश'ने आक्रमकपणे बंद पाडल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीच्या सुमारास आंदोलन अधिक हिंसक वळणावर पोहोचले. हेरवाड आणि नांदणी परिसरातून जवाहर व पंचगंगा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांना आंदोलकांनी रोखले. आक्रमक आंदोलकांनी ही उसाची वाहने पेटवून दिली, तसेच अनेक वाहनांचे टायर फोडून वाहतूक रोखून धरली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे सावट पसरले आहे.
'आंदोलन अंकुश'ने आपले आंदोलन मागे घेतलेले नाही आणि शेतकरीही ऊस तोडीस ठामपणे नकार देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तोडगा निघून दोन दिवस उलटले तरी शिरोळ तालुक्यातील साखर कारखाने पूर्णपणे बंद आहेत.
'आंदोलन अंकुश'चे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी उसाला प्रतिटन ४५०० रुपये दर मिळण्याची ठाम मागणी केली आहे. योग्य तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन असेच तीव्र राहील, असा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.