

शिरढोण : ग्रामपंचायतीमधील गेल्या साडेचार वर्षांतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. चौकशी समितीने दप्तर तपासणी पूर्ण करूनही अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, प्रशासकीय यंत्रणेवर संशयाची सुई वळली आहे. या दिरंगाईविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून थेट गटविकास अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शिरढोण ग्रामपंचायतीमध्ये गेल्या साडेचार वर्षांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. डिसेंबरमधील ग्रामसभेत यावरून मोठा गदारोळ झाला होता, मात्र तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नव्हती. अखेर ग्रामस्थांच्या मागणीनुसार २०२२ पासूनच्या विकासकामांची चौकशी सुरू करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सखोल चौकशीत खालील बाबींमध्ये अवाजवी खर्च आणि अनियमितता असल्याचे समोर आले आहे. कामाच्या दर्जावर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह, चढ्या दराने खरेदी केल्याचा संशय आहे. तसेच माजी ग्रामसेवक विनायक शेवरे यांनी काही महत्त्वाची प्रोसिडिंग्स अपूर्ण ठेवून दप्तर घरी नेल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी पाहून स्वतः चौकशी समितीचे सदस्यही अवाक झाले होते, अशी चर्चा गावात रंगली आहे.
तपासणी पूर्ण होऊन बराच काळ लोटला तरीही अंतिम अहवाल सादर करण्यास अधिकारी जाणीवपूर्वक विलंब लावत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दोषींना वाचवण्यासाठीच हा अहवाल दडपला जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
"गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित अधिकारी चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ करत आहेत. जर येत्या दोन दिवसांत हा अहवाल प्राप्त झाला नाही, तर आम्ही गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू. तसेच, टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणीही वरिष्ठ स्तरावर करणार आहोत."
— विश्वास बालीघाटे, ग्रामस्थ, शिरढोण