

शिरढोण : शिरढोण (ता.शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमध्ये २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत १५ वा वित्त आयोग निधी तसेच घरफाळा व पाणीपट्टी वसुली खर्चात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी १५ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे.मात्र चौकशीचा ठोस निष्कर्ष समोर न आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणात शिरोळचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच चौकशी समितीकडून जाणूनबुजून टाळाटाळ केली जात आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर दिले जात नसून उलट उडवाउडवीची व उद्धट उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
दरम्यान, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर अविनाश पाटील, विश्वास बालीघाटे, प्रशांत कुगे, सातगोंडा पुजारी, सुरेश सासणे, शिवाजी कोळी, संजय दणाने व सुकुमार पुजारी यांच्या सह्या आहेत.