

कोल्हापूर: एकनाथ नाईक
शेंडा म्हणजे शेवटचे टोक. कोल्हापूरच्या शेवटच्या टोकाला असलेला पार्क म्हणजे शेंडा पार्क होय. हा पार्क 1890 मध्ये वसला आहे. येथे संस्थान काळात घोड्यांची दगडी कमानीची पागा होती. सुमारे 537 एकर क्षेत्राच्या माळावर घोड्यांना पळवण्यासाठी गोलाकार मैदान होते. पण आता याच शेंडा पार्कच्या मोकळ्या माळावर रुग्णालये, वसतिगृहे, क्रीडा क्षेत्रातील अद्ययावत केंद्रे, शासकीय प्रशासकीय अनेक कार्यालयांची सुरू असलेली बांधकामे यामुळे या शेंडा पार्कच्या माळाचं आता रूपडं बदलतंय!
प्रशासकीय भवन, वैद्यकीय महाविद्यालय
शेंडा पार्क येथे पूर्वेला प्रशासकीय इमारतीचे काम गतीने सुरू आहे. तर पश्चिम दिशेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकामे सुरू आहे. यामध्ये मुला-मुलींचे वसतिगृह, माता बाल रुग्णालय, अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने आदींसह स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, न्यायवैद्यकीय विभाग इमारत, 500 क्षमतेचे ऑडिटोरियम अशी कामे येथे सुरू आहेत. शेंडा पार्क येथे पूर्ण झालेली कामे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, केंद्रीय ग्रंथालय, परीक्षा हॉल, शवविच्छेदन गृह.
आरोग्य विभागाच्या काही कार्यालयांचे स्थलांतर...
सध्या शेंडा पार्क येथे कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सहायक संचालक आरोग्य सेवा हिवताप कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय कार्यालयांसह अधिकारी, कर्मचारी निवासस्थानांची कामे पूर्ण झाली असून ही कार्यालये येथे सुरू आहेत.