

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी बोलावलेल्या सभेकडे महायुतीच्या १२ संचालकांनी पाठ फिरवली. या सभेसाठी आवश्यक १४ संचालक मंडळाचा कोरम पूर्ण न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली. समविचारी आघाडीच्या संचालकांनी बहुमताच्या जोरावर बैठक घेण्याची मागणी केली खरी; मात्र, ती फेटाळण्यात आली. यानंतर 'समविचारी'च्या संचालकांनी समांतर सभा घेत शशिकांत चुयेकर यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड केली. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर ताराबाई पार्क येथील कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बहुमताद्वारे समविचारी आघाडीकडून अध्यक्ष निवड
कोल्हापूर : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीची सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या संचालकांनी समांतर सभा घेत संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली. बहुमताच्या संख्येवर ही निवड केली असल्याची माहिती संचालक अभिजित तायशेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच, संचालक मंडळ ‘गोकुळ’मध्ये कामकाज सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तायशेटे यांनी, सभा तहकूब केल्यानंतर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना कोरमचा तांत्रिक मुद्दा न घेता बहुमताच्या संख्येवर निवड करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी ती अमान्य केली. त्यामुळे ‘समविचारी’च्या १३ संचालकांनी समांतर सभा घेत बहुमताने शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली असल्याचे सांगितले. तसेच, चुयेकर यांनी पदभारही स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. शशिकांत पाटील-चुयेकर यांनी ‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. सध्या ‘गोकुळ’चे संकलन गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना प्रोत्साहन देत दूध संकलनामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन
चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ‘समविचारी’च्या संचालकांनी ‘गोकुळ’चे संस्थापक स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आ. ऋतुराज पाटील उपस्थित होते.
निवडीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
अध्यक्ष निवडीसाठी ‘समविचारी’चे कार्यकर्ते सकाळी साडेदहा वाजल्यापासून येथे थांबून होते. दुपारी चार वाजता ‘समविचारी’चे संचालक बाहेर आले. प्रवेशद्वाराजवळ माजी आ. ऋतुराज पाटील यांनी समांतर सभेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगताच कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत विजयाच्या घोषणा देत एकच जल्लोष केला.
समविचारी न्यायालयात जाणार
गोकुळ अध्यक्ष निवडीवरून समविचारी आघाडी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या सभा तहकुबीच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याची शक्यता आहे.
* याआधी समविचारीच्या संचालकांनी बहुमताच्या संख्येवर अध्यक्ष निवडीची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. मात्र ती अमान्य करण्यात आली. यानंतर समविचारीने समांतर सभा घेत सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांच्या आधारे बहुमताच्या संख्येवर शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली. सुमारे ४.३० तास अध्यक्ष निवडीबाबातच्या घडामोडी सुरू होत्या.
* अक्षपदाच्या निवडणुकीवर दिवसभर नाट्यमय घडामोडी झाल्या. बहुमत असूनही 'समविचारी'ला समांतर सभा घ्यावी लागली. या प्रकाराने गोकुळ अध्यक्षपदाचे त्रांगडे निर्माण झाले असून उद्यापासून अध्यक्षपदाची निवडणूक कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे दोन्ही आघाडीच्या नेत्यांत दिवसभर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहिल्या.