

कोल्हापूर : महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख आणि माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती अश्पाक आजरेकर यांच्यासह सुमारे 15 ते 20 माजी नगरसेवक मंगळवारी (दि. 24) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
आ. सतेज पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून देशमुख यांची ओळख आहे. महापालिकेतील काँग्रेसच्या सत्ता काळात देशमुख यांनी आघाडीचे कारभारी म्हणून भूमिका पार पाडली आहे. माजी स्थायी समिती सभापतीपद त्यांनी भूषविले आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवारीवरून देशमुख आणि आ. पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशमुख यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर देशमुख यांची शिवसेनेशी सलगी वाढली.
प्रवेशासाठी सोमवारी रात्री हे सर्वजण मुंबईकडे रवाना झाले. मात्र, कोण सोबत आहेत, त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यातच आहेत. मुंबईत मंगळवारी होणार्या पक्षप्रवेशानंतरच देशमुख यांच्यासोबत कितीजण आणि कोण आहेत, हे स्पष्ट होणार आहे.