

कोल्हापूर/ कसबा बावडा : संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांसाठी जगणार्या राजाच्या चरणी मी नतमस्तक होत आहे, शाहू जयंतीदिनीच शाहू जन्मस्थळी येण्याचे भाग्य मिळाले, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्यावर आलेल्या पवार यांनी शाहू जन्मस्थळ आणि दसरा चौकात जाऊन लोकराजा राजर्षी शाहूंना अभिवादन केले.
पवार यांचे दुपारी चार वाजता कोल्हापुरात आगमन झाले. ताराराणी चौकातून ते थेट शाहू जन्मस्थळी गेले. राजर्षी शाहूंना अभिवादन केल्यानंतर बोलताना पवार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या अंत:करणात रुजलेले व्यक्तिमत्त्व आहे. केवळ कोल्हापूर संस्थानांपुरतेच नाही, तर संपूर्ण देशभरात राज्य कसे करावे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
यावेळी शाहूकालीन पैलवानांचे छायाचित्र व राजर्षी शाहू छत्रपती स्मृतिग्रंथ भेट देण्यात आला. भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही त्यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, श्रीराम सेवा संस्था सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, किशोर पाटील, मिलिंद पाटील, युवराज उलपे आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापुरात आगमन होताच पवार यांचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शाहू उद्योग समूहाचे समरजित घाटगे, माजी आमदार राजीव आवळे, बाजीराव खाडे, पद्मजा तिवले, रोहित पाटील, अनिल घाटगे, सुनील देसाई, सादीक अत्तार आदींनी त्यांचे स्वागत केले.
शाहू जन्मस्थळावरून पवार दसरा चौकात आले. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांसह पवार यांनीही हात उंचावून ‘छत्रपती शाहू महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.