Dr. D.Y. Patil : विकासदृष्टी लाभलेले लोकनेते

Dr. D.Y. Patil
Dr. D.Y. Patil
Published on
Updated on

शरद पवार

माजी केंद्रीय कृषिमंत्री

पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्याशी माझा परिचय केवळ सार्वजनिक जीवनापुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आम्ही सहकारी म्हणून काम केले. त्या काळात त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. शांत, संयमी, अभ्यासू आणि विकासाचा ध्यास घेतलेले लोकप्रतिनिधी अशी त्यांची माझ्या मनात कायमची प्रतिमा आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जनतेच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, त्यांची खरी ओळख घडली ती शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत उभारलेल्या भव्य कार्यामुळे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणता येते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. या विश्वासातून त्यांनी देशभरात उभारलेल्या शैक्षणिक संस्था आज लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देत आहेत. विशेषतः, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे कृषी क्षेत्राविषयी असलेली त्यांची आस्था. शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास होता. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनाला प्रोत्साहन आणि कृषी शिक्षणाचा विस्तार याबाबत ते नेहमीच सकारात्मक भूमिका मांडत असत. महाराष्ट्राच्या विकासात शेती आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांनी एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे, ही त्यांची धारणा होती. त्यांच्याशी झालेल्या अनेक संवादांमध्ये मला त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती आली.

कोणताही विषय केवळ वर्तमानापुरता न पाहता, त्याचा पुढील पिढ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन ते विचार मांडत असत. संस्था उभारणे ही गोष्ट वेगळी; पण त्या संस्था गुणवत्ता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपत दीर्घकाळ सक्षमपणे चालतील, अशी व्यवस्था उभारणे ही त्यांची खरी ताकद होती. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी दिलेले योगदान तितकेच उल्लेखनीय आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि दर्जेदार उपचार सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावेत, या हेतूने त्यांनी उभारलेली रुग्णालये आज लाखो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहेत. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेला आदर्श समाजासाठी प्रेरणादायी आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, माणसांशी जिव्हाळ्याने वागण्याची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन हे गुण प्रकर्षाने जाणवतात. मोठे कार्य करूनही प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा त्यांचा स्वभाव अनेकांसाठी अनुकरणीय होता. आज त्यांनी उभारलेल्या संस्था त्यांच्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. हजारो विद्यार्थी, संशोधक, डॉक्टर आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिक त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत.

समाजासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारे कार्य हेच एखाद्या व्यक्तीचे खरे स्मारक असते. त्या अर्थाने डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या संस्था हेच त्यांच्या जीवनकार्याचे जिवंत स्मारक आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्यातील शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक जिवनातील एक मोठे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्याशी असलेल्या सहवासाच्या अनेक आठवणी आज मनात दाटून येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news