कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपावरून नाराज झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला रामराम करत तिसर्या आघडीसाठी व्यूहरचना सुरू केली आहे. तिसरी आघाडी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी, आप आणि वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची शुक्रवारी चर्चा झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी जनसुराज्यचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्याशी चर्चा केली आहे. शनिवारी (दि.27) तिसर्या आघाडीची अधिकृत घोषणा होईल.
महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जागा वाटपाच्या पहिल्याच टप्प्यात आघाडीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. ‘आप’ला जागा न दिल्याने त्यांनी प्रथम आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीने दिलेला जागांचा प्रस्ताव काँग्रेसने फोटाळल्यामुळे स्वबळाची घोषणा केली. त्यासाठी काँग्रेसला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला होता; परंतु काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे राष्ट्रवादीने शुक्रवारी महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
अयोध्या टॉवर येथे सायंकाळी राष्ट्रवादी, आप आणि वंचित बहुजन आघाडी यांची बैठक झाली. या बैठकीत तिसरी आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाला. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येते. ठाकरे शिवसेनाही जागा वाटपावर नाराज असल्याने त्यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय महायुतीमधील जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली असल्याचे व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. या चर्चेत तिसर्या आघाडीसंदर्भात आम्ही बोललो असल्याचेही ते म्हणाले; परंतु जनसुराज्य शक्ती पक्षाकडून अद्याप त्याला प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
बैठकीस व्ही. बी. पाटील यांच्यासह आपचे संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडीचे अरुण सोनवणे, आर. के. पोवार, रोहित पाटील, बाजीराव खाडे, अनिल घाटगे उपस्थित होते.