Dr. D. Y. Patil : साहेबांनी माणसं जोडली, मी मात्र संसार जपला !

डी. वाय. पाटील यांच्या आठवणींनी उलगडले पत्नी शांतादेवी यांचे भावविश्व
Shantadevi Patil
शांतादेवी पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान पतीची मला साथ मिळाली. साहेबांनी आयुष्यभर माणसं जोडली, अनेकांचे संसार उभे केले, कित्येकांना आधार दिला. त्यांची पत्नी म्हणून हे सर्व जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं, याचाच कायम अभिमान वाटतो. सात दशकांचा सहजीवनाचा प्रवास साहेबांच्या निधनाने थांबला असला, तरी त्यांच्या आठवणींची शिदोरी कायम राहील, अशा शब्दांत शांतादेवी पाटील यांनी डी. वाय. पाटील यांच्यासोबत जोडलेले भावविश्व उलगडले.

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व जितके विराट, तितकाच त्यांच्या आयुष्याचा एक आधार म्हणजे पत्नी शांतादेवी पाटील. आयुष्यभर प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या शांतादेवींनी संसार, मुलांचे संगोपन आणि संस्कार यांची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. त्यामुळेच डी. वाय. पाटील यांना समाजकारण, शिक्षण आणि राजकारणात झोकून देणे शक्य झाले. मंगळवारी या नात्याचा एक धागा कायमचा तुटला आणि शांतादेवी यांच्या डोळ्यांना धार लागली.

शांतादेवी डी. वाय. पाटील यांच्या आठवणी सांगताना म्हणाल्या, 'साहेब सतत मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी कामानिमित्त फिरतीवर असायचे. त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्याची जबाबदारी माझ्याकडेच होती. मी कधीही तक्रार केली नाही. संसाराचा व्याप सांभाळत मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार देण्याचा प्रयत्न केला. अर्थात, साहेब दौऱ्यावर असले, तरी त्यांचे लक्ष असायचे. पाचही मुलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे, शिस्तीत राहावे आणि कष्टाची किंमत समजून घ्यावी, यावर त्यांचा कायम भर होता.'

शांतादेवींनी व्यक्त केलेल्या या भावना आज डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अधिकच हळव्या करणाऱ्या आहेत. त्यांच्या शब्दांतून उलगडलेला हा प्रवास केवळ एका महान व्यक्तिमत्त्वाचा नाही, तर त्यामागे निःशब्द उभ्या राहिलेल्या एका कर्तृत्ववान सहचारिणीचाही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news