

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासह रस्ते, गटार, पिण्याचे पाणी, पथदिवे सर्वच बाबतीत महापालिकेच्या कारभाराची बोंब गेल्या पाच वर्षांतील ‘प्रशासकराज’मध्ये झाली आहे. कोल्हापूरकरांच्या मते, महापालिकेचे प्रशासन पाच वर्षांत नापास झाले असून, महापालिकेने सर्वपक्षीय शहर-जिल्हा कृती समितीच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्यास मंगळवारी (दि. 16) महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकार्यांच्या नावाने शंखध्वनी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय शहर-जिल्हा कृती समितीने शुक्रवारी दिला.
रखडलेली हद्दवाढ याचा जाब विचारण्यासाठी कृती समितीचे कार्यकर्ते महापालिकेत गेले होते. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रशांत भोसले आदींवर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. परंतु, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने कार्यकर्त्यांनी मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी महापालिका प्रशासनाने काय केले? नागरिकांचा श्वास आहे त्या शहराच्या हद्दीत गुदमरत असून, हद्दवाढ झाली पाहिजे, यासाठी पन्नास वर्षे लढा सुरू असूनही यश मिळत नाही. महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी काहीही करत नाहीत.
त्यामुळे यापुढे त्यांच्याविरोधात कडक धोरण अवलंबिले जाईल. अधिकार्यांनी एक तर ठोक उत्तरे द्यावीत; अन्यथा कोल्हापुरातून गाशा गुंडाळावा, असे बाबा इंदुलकर यांनी सांगितले. तर बाबा पार्टे यांनी, लेखी उत्तरे घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही, अशी भूमिका मांडली. अनिल कदम यांनी, महापालिका प्रशासन ढिम्म आहे. काहीही काम केले जात नाही, असा आरोप केला; तर आर. के. पोवार यांनी, आम्ही या महापालिकेत पदाधिकारी, नगरसेवक म्हणून काम केले आहे. परंतु, असा अनुभव कधी आला नाही. प्रशासन सपशेल फेल आहे. दिलीप देसाई यांनी, अधिकार्यांवर कोणाचा दबाव आहे, हे त्यांनी जाहीर करावे, असे मत मांडले. यावेळी अनिल घाटगे, किशोर घाटगे, प्रमोद दाभाडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.