

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग राज्य सरकारचा गेमचेंजर प्रकल्प आहे. प्रकल्पाचे अलाईनमेंट बदलले असले, तरी महामार्ग जाणार्या ठिकाणांवरील स्थानिक शेतकर्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मंत्री सामंत म्हणाले, बारामतीची जागा ही नेहमीच पवार कुटुंबीयांची राहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर येथून सुनेत्रा पवार निवडणूक लढविणार असल्यास ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी, खरातसारखी प्रवृत्ती ठेचून काढा. अशी प्रवृत्ती पुन्हा देशात निर्माण होता कामा नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. याप्रकरणी कोणी लेटरपॅडवर नेत्यांची नावे मिळून आली म्हणून बदनामी करत असेल, तर संबंधितांची चौकशी झाली पाहिजे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
दावोसमध्ये जाता येत नाही म्हणून बदनामी
दावोसमधील करारांनंतर महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक अपेक्षेपेक्षा वाढली आहे. छ. संभाजीनगर, मराठवाडा भागाची औद्योगिक क्षेत्रात चांगली प्रगती झाली आहे. रोजगार वाढले आहेत. तरीही विरोधक दावोसवरून टीका करत आहेत. कदाचित त्यांना दावोसला जाता येत नाही, म्हणून बदनामी केली जात असेल, असा टोला सामंत यांनी लगावला.
पीएनजी गॅस पाईपलाईनवरून कनेक्शन दिलेच पाहिजे
गॅसटंचाईवर बोलताना मंत्री सामंत यांनी, ज्या औद्योगिक वसाहतींपासून पीएनजी गॅस पाईपलाईन गेली आहे, तेथील उद्योगांना या पाईपलाईनवरून गॅस कनेक्शन दिलेच पाहिजे, अशी भूमिका घेतली असल्याचे सांगितले.