

कोल्हापूर : नागपूर-गोवा या प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गाला विरोध होत असतानाच राज्य सरकारने या महामार्गाचे सोलापूर-चंदगड (कोल्हापूर) संरेखन (अलाईनमेंट) बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोलापूर-चंदगड या मार्गावरील काही ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलाईनमेंट बदलण्याची घोषणा विधानसभा अधिवेशनात केली आहे.
नागपूर-गोवा ‘शक्तिपीठ’ मार्ग हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. शेतकर्यांनी विरोध केल्याने काही ठिकाणी भूसंपादनात अडथळे आले आहेत. मागील काळामध्ये लोकांचे काही आक्षेप आले होते. सोलापूरपासून शक्तिपीठ मार्गाची अलाईनमेंट ही राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात असल्याचा लोकांचा आक्षेप खरा होता. त्यानुसार संरेखनात बदल करण्यात आले आहेत.
नागपूर-गोवा 805 कि.मी. अंतर असून, यासाठी एकूण खर्च 86 हजार 600 कोटी, 12 जिल्हे, 37 तालुक्यांतील 368 गावांतील 12 हजार 889 गटांतील 27 हजार 500 एकर भूसंपादन होणार होते. महामार्गावर 48 मोठे पूल, 28 ठिकाणी रस्ते क्रॉसिंग, 3 ठिकाणी डोंगर पोखरून बोगदे काढण्याचे नियोजन होते. आता नव्याने संरेखन बदलण्यात येणार असल्याने यापैकी कोणत्या गावातील किती भूसंपादन कमी होणार याकडे लक्ष लागले आहे.
नवीन अलाईनमेंट सोलापुरातून सांगली, कोल्हापूर, चंदगड अशी जाणार आहे. नव्याने होणार्या अलाईनमेंटनुसार बरीच वनजमीन शक्तिपीठ महामार्गातून वगळण्यात आली आहे. चंदगड येथील लोकांनी मोर्चा काढून आम्हाला हा महामार्ग हवा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने नव्याने सर्वेक्षण सुरू केले असून, तीन पर्यायानुसार सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर अंतिम संरेखनाचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.