

शिरोली पुलाची : कोल्हापूर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतानाही, शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने पुणे-बंगळूर महामार्गावर ठिय्या आंदोलन करत 'रास्ता रोको' केला. याप्रकरणी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिरोली एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरा ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कृती समितीने मंगळवारी (दि.१) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पंचगंगा पुलाजवळील पीर अहमदसो दर्ग्यासमोर महामार्ग अडवला. यावेळी आंदोलकांनी, "या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय" आणि "जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची" अशा घोषणा देत वाहतूक रोखून धरली.
शिरोली पोलीस ठाण्याचे निलेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सरकारतर्फे ३० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या रास्ता रोको मध्ये सहभागी असणारे माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवने, सचिन चव्हाण, विक्रांत पाटील, बाबासाहेब देवकर, रघुनाथ कांबळे, शिवाजी मगदूम, अजित पवार, विक्रम पाटील,अविनाश कडोले, डॉक्टर बाबासाहेब पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे, रवी किरण इंगवले,आशिष पाटील, प्रवीण पाटील, निशिकांत पाटील, प्रकाश पाटील, सुभाष देसाई, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, संग्राम पाटील, युवराज गवळी, आकाश भास्कर, अतुल दिघे, रघुनाथ पवार, राजेंद्र गड्डेनवार, रणजीतसिंह पाटील, मोहन सालपे, रणजीत कुसाळे ,राजू लाटकर अशा 30 जणांविरोधात सरकारतर्फे शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.