

कोल्हापूर: एकीकडे देश स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या शेतशिवारात तिरंगा ध्वज फडकावून शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार पुकारला.
"तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात" या अभिनव घोषणेसह, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील साजणी आणि शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे झालेल्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यावेळी आंदोलकांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. "राज्यात रत्नागिरी-नागपूर महामार्ग आधीच अस्तित्वात आहे आणि तो तोट्यात सुरू आहे. असे असताना केवळ काही मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणि ५० हजार कोटी रुपयांचा अनावश्यक खर्च जनतेवर लादण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे," असा थेट आरोप शेट्टी यांनी केला. ते पुढे म्हणाले, "या महामार्गामुळे पुढील ९० वर्षांपेक्षा जास्त काळ जनतेला टोलच्या ओझ्याखाली राहावे लागेल. जे शेतकरी १५० कोटी जनतेची भूक भागवण्यासाठी काळ्या आईची सेवा करतात, त्यांच्याच जमिनीवर सरकार वरवंटा फिरवत आहे. फडणवीस सरकारचा हा घाट आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही."
संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीवर भर दिला. "केंद्र आणि राज्य सरकारने कर आणि टोलच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जगणे मुश्किल केले आहे. पण देशातील शेतकऱ्यांच्या मनगटात सरकारला झुकवण्याची ताकद आहे, हे यापूर्वीही सिद्ध झाले आहे," असे ते म्हणाले. फोंडे यांनी सांगितले की, "या महामार्गाने बाधित होणाऱ्या सर्व १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकजुटीची वज्रमूठ आवळली आहे. हा लढा केवळ जमिनीचा नाही, तर आमच्या अस्तित्वाचा आहे आणि हा महामार्ग रद्द होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही."
या आंदोलनात स्थानिक पातळीवरील नेत्यांचा आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. यावेळी साजणी गावचे सरपंच शिवाजी पाटील , बी.डी.पाटील , शिवगोंडा पाटील , अरूण मगदूम , युवराज शेटे , कृष्णात पाटील, कृष्णात मसुरकर तसेच निमशिरगांव येथील मा. सरपंच शिवाजी कांबळे ,शांताराम कांबळे , सुधाकर पाटील , विक्रम चौगुले , दिनकर पाटील , यांचेसह दोन्ही गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.