

कोल्हापूर : नागपूर ते पात्रादेवी या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी नवी अलाईन्मेंट करण्यात आली आहे. त्यानुसार या मार्गाचे सोलापूर ते कोल्हापूर जिल्ह्यापर्यंतचे तीन प्रारूप आराखडे तयार करण्यात आले आहेत. एकीकडे शेतकर्यांचा विरोध असेल, तर चर्चा करून पर्याय काढू, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगत असताना दुसरीकडे कोल्हापुरातून हा महामार्ग जाणार नाही, असे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सांगत असतानाच या मार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार असल्याचे या प्रारूप आराखड्यातून स्पष्ट होत आहे. यामुळे हा मार्ग होणार की नाही, याबाबत साशंकताच आहे.
शक्तिपीठ मार्गाला शेतकर्यांचा विरोध आहे. या विरोधात आंदोलनेही होत आहेत. शेतकर्यांचा विरोध असेल, तर त्यांना विश्वासात घेतल्याखेरीज हा महामार्ग होणार नाही, असे वेळोवेळी राज्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या मार्गाचा अत्यावश्यक कामात राज्य शासनाने समावेश केला आहे. या महामार्गासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील 161 गावांचा समावेश असलेले तीन प्रारूप आराखडे तयार करण्यात आले असून त्यानुसार या मार्गाच्या नव्याने अलाईन्मेंट केल्या आहेत. या महामार्गाला होणार्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नव्याने अलाईन्मेंट (मार्ग रचना) केली असली, तरी हा मार्ग जिल्ह्यातील 61 गावांतून जाणार आहेच, असेच स्पष्ट होत आहे. दरम्यान नव्याने तयार केलेल्या प्रारूप आराखड्याबाबत स्थानिक कार्यालयाच्या पातळीवर कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हा महामार्ग होणार की त्यातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळणार, याबाबत संमभ—ाचेच वातावरण आहे.
नव्याने तयार करण्यात आलेल्या या प्रारूप आराखड्यानुसार एक अलाईन्मेंट 324.55 किलोमीटर लांबीची आहे. त्याकरिता 3,970 हेक्टर जमीन संपादित होणार असून त्याकरिता 21 हजार 582 कोटी खर्च येईल. दुसर्या अलाईन्मेंटनुसार दुसरा प्रारूप आराखडा हा 306 किलोमीटर लांबीचा आणि 20 हजार 362 कोटी रुपये खर्चाचा तयार केला आहे. याकरिता 3,682 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.तिसर्या आराखड्यानुसार तयार केलेल्या अलाईन्मेंटप्रमाणे हा मार्ग सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात 305 किलोमीटर लांबीचा असेल. त्याकरिता 3,672 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून 20 हजार 295 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.