‘शक्तिपीठ’वर खडी-डांबर पडेपर्यंत शेतकर्‍यांच्या पाठीशी

महामार्ग समर्थन मेळाव्यात आ. क्षीरसागर यांची ग्वाही
Shakti Peeth Highway News
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीतर्फे आयोजित बाधित शेतकर्‍यांच्या मेळाव्यात हात उंचावून महामार्गाचे समर्थन करताना खा. धनंजय महाडिक, आ. गोपीचंद पडळकर, आ. राजेश क्षीरसागर, समितीचे समन्वयक दौलतराव जाधव, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव आदी. मेळाव्यास उपस्थित शेतकरी बांधव. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गावर खडी-डांबर पडेपर्यंत शेतकर्‍यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीतर्फे आयोजित बाधित शेतकर्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

आ. क्षीरसागर म्हणाले, महाविकास आघाडीने निवडणुकीत शक्तिपीठविरोधात प्रचार केला, तरीही शेतकर्‍यांनी महायुतीचे जिल्ह्यात दहा आमदार दिले. लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराजांचा विजय त्यांच्या प्रतिमेचा विजय आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे योगदान नाही. शक्तिपीठला विरोध करणार्‍यांमध्ये बाधित शेतकरी कमी आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी एक हजार सह्यांचे निवेदन या महामार्गाच्या समर्थनार्थ दिले आहे. महाविकास आघाडी सातत्याने विकासाला विरोध करण्याचे काम करत आहे. शक्तिपीठसंदर्भात सरकार शेतकर्‍यांना चांगला मोबदला देणार आहे. त्यामुळे कुणाचेच नुकसान होणार नाही. आता समर्थन करणार्‍या शेतकर्‍यांवर दादागिरी केली जात आहे; पण महायुती सरकार या शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात विकासाला विरोध करणारी मंडळी आहेत. त्यांना कोल्हापूरचे चांगले व्हावे, असे वाटत नाही. हॉटेल आणि मॉलमुळे विकास होऊ शकत नाही. त्यासाठी उद्योग आले पाहिजेत. रोजगार निर्मिती झाली पाहिजे. राम मंदिरामुळे अयोध्येत अर्थव्यवस्थेला गती आली तसेच महाकुंभ मेळ्यामुळे उत्तर प्रदेशमध्येही अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. त्यामुळे या महामार्गाच्या माध्यमातून श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढून जिल्ह्याची अर्थव्यवस्था गतिमान होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांचे समाधान झाले पाहिजे, यासाठी फडणवीस सरकार राज्यात उच्चांकी दर देणार आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, 12 जिल्ह्यांपैकी कोल्हापुरातून विरोध आहे असा चुकीचा संदेश राज्यभर गेला होता. या मेळाव्याने हा संदेश खोडून काढला आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी मूळ शेतकर्‍यांचा पाठिंबा आहे. मात्र राजकीय बाधित मंडळी त्याला विरोध करत आहेत. यावेळी समितीचे समन्वयक दौलतराव जाधव, संजय संकपाळ (गडहिंग्लज), पट्टणकोडोलीच्या रुचिता बाणदार, शुभांगी पोवार, विजय हवालदार, जयकुमार पाटील निवास राजगिरे (कूर), संजय नांदले, सुरेश पाटील (आजरा), कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजी जाधव, रुचिता बाणदार, किशोर घाडगे, कमलाकर जगदाळे, शुभांगी पोवार यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ‍ॅड. नवनाथ पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अंकुश निपाणीकर यांनी सूत्र संचालन केले.

मेळाव्यातील ठराव

*शक्तीपीठ महामार्ग मूळ आराखड्याप्रमाणेच करावा

*कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विक्रमी मोबदला मिळावा

*भूसंपादन प्रक्रिया होण्यापूर्वीच नुकसान भरपाईचा बेस्ट दर जाहीर करावा

*प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना प्रकल्पग्रस्त दाखले मिळावेत

*प्रकल्पाअंतर्गत व्यावसायिक प्रयोजनात प्रकल्पबाधितांना प्राधान्य द्यावे

*पूरबाधित क्षेत्रात पिलर उभारून महामार्ग न्यावा

*या महामार्गाच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी 2013 चा कायदा संपूर्ण अंमलात आणावा. त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजूरी घेऊन शासन आदेश काढल्यानंतरच भूसंपादन करावे

शक्तिपीठ महामार्ग हवा की नको जनतेनेच ठरवावे : मंत्री मुश्रीफ

कागल : शक्तिपीठ महामार्गाला माझा विरोध नाही. मात्र, शक्तिपीठ महामार्ग हवा की नको ते जनतेनेच ठरवावे. जनतेच्या इच्छेखातर मी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला होता; पण माझा याला वैयक्तिक विरोध नाही, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. कागल येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

ते म्हणाले, शक्तिपीठला माझा विरोध नाही. लोकसभा निवडणुकीवेळी ज्या ठिकाणाहून हा मार्ग जाणार होता, तिथे महायुतीला कमी मतदान झाले होते. शेतकर्‍यांचा फार मोठा विरोध होता. विधानसभेच्या निवडणुकीमध्येदेखील मला दोन-तीन ठिकाणी या प्रश्नावरून अडवले होते. शेतकरी तयार असतील आणि त्यांना जास्त दर मिळत असेल, तर त्यांनीच महामार्ग हवा की नको, हे ठरवायचे आहे. यामध्ये राजकारणाचा विषयच येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news