

सुभाष पाटील
विशाळगड : आज जगभरात ८ मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. सोशल मीडियापासून ते मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत सगळीकडे स्त्रीशक्तीचा जागर सुरू आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील गावकुसावर राहणाऱ्या माऊलीला आजही 'महिला दिन' म्हणजे काय, हे ठाऊक नाही. तिच्यासाठी आजचा दिवसही इतर दिवसांसारखाच काबाडकष्टाचा आणि घामाचा आहे.
काट्याकुट्यांचा रस्ता अन् संघर्षाची वाट
शाहूवाडी तालुक्याचा बराचसा भाग डोंगराळ आणि दुर्गम आहे. इथल्या महिलांचे आयुष्य पहाटेच्या जात्यापासून सुरू होते ते थेट रात्रीच्या चुलीपर्यंत. डोक्यावर पाण्याचा हंडा, पाठीवर सरपणाची मोळी आणि हातात शेतीचे अवजार, हेच इथल्या स्त्रीचे खरे 'दागिने' बनले आहेत. शहरात महिलांच्या हक्कांवर मोठी भाषणे होत असताना, इथली माय मात्र अनवाणी पायाने काट्याकुट्यांच्या वाटेवरून संसाराचा गाडा ओढत आहे.
संस्कृतीची जपवणूक, पण हक्कांची पायमल्ली
गावाकडच्या याच महिलांनी आज खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, परंपरा आणि रीतीरिवाज टिकवून ठेवले आहेत. संकटांचे कितीही अंधारी वादळे आली तरी, 'उद्याचं पाहू' म्हणत ही स्त्री कुटुंबाचा आधारवड बनून उभी राहते. मात्र, दुर्दैवाने आजही आरोग्य, शिक्षण आणि सोयीसुविधांच्या बाबतीत या भागातील स्त्रियांना संघर्षच करावा लागतोय.
उत्सवी सोहळ्यापेक्षा बांधावरच्या सन्मानाची गरज
आज गरज आहे ती पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला दिन साजरा करण्याची नाही, तर शेताच्या बांधावर राबणाऱ्या त्या कष्टकरी माऊलीच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याची. जोपर्यंत गावकुसातल्या शेवटच्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू येत नाही, तोपर्यंत हे सोहळे पोकळच ठरतील. संघर्षाचा रस्ता कुणालाही दोष न देता चालत राहणाऱ्या आणि तरीही जगाला मायेचा ओलावा देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आजच्या दिनी हक्काचा सलाम!
"आम्हाला कुठला आलाय महिला दिन? सकाळी उठल्यापासनं रानात गेल्याशिवाय आमची चूल पेटत नाही. सरकारनं आम्हाला सन्मान द्यावा किंवा न द्यावा, पण आमच्या कष्टाचं चीज व्हावं एवढीच अपेक्षा."
- धोंडूबाई कस्तुरे
शुभेच्छा पल्याडचे वास्तव!
सन्मानाचा दिवस 'तिचा' आणि संघर्षाचा प्रवासही 'तिचाच'. शाहुवाडीतील या विदारक चित्रातून एकच प्रश्न उभा राहतोय, प्रगतीच्या गप्पांमध्ये या खडतर वाटा आणि डोक्यावरचं ओझं कधी संपणार? महिला दिनाचा खरा अर्थ तिच्या आयुष्यातील हा संघर्ष संपवण्यातच आहे.