

कोल्हापूर : तपासकामात दिरंगाई करणाऱ्या पोलिस हवालदारास मंगळवारी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी निलंबित केले. महादेव यशवंत भाट असे निलंबित पोलिस हवालदाराचे नाव आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मंगळवारी (दि. २८) शाहूवाडी पोलिस ठाण्याची तपासणी केली. यावेळी पोलिस हवालदार महादेव भाट यांच्याकडे २०२४ पासून तपासासाठी असलेला एक गुन्हा प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. महादेव भाट याने कोणताही तपास न करता त्याकडे दुर्लक्ष केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना करूनही तपासात अपेक्षित प्रगती झाली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भाटवर निलंबनाची कारवाई केली.