

बांबवडे: शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये नियमबाह्य पद्धतीने बायोमॅट्रिक हजेरी मशिन बसवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भारतीय दलित महासंघाने (भादमा) पुकारलेले आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. "या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल," असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी (BDO) महेश कुचेवार यांनी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
नेमके प्रकरण काय?
शाहूवाडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये सध्या बायोमॅट्रिक मशिन बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना प्रशासकीय नियमांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मशिन खरेदीसाठी कोणतीही अधिकृत ई-निविदा (E-Tender) काढण्यात आली नाही. ग्रामपंचायतींकडून कोणतेही मागणीपत्र किंवा कार्यादेश (Work Order) नसताना थेट मशिन बसवण्यात आल्या. संबंधित पुरवठादार कंपनी आणि पंचायत समितीतील काही भ्रष्ट अधिकारी यांनी संगनमताने शासनाच्या निधीवर दरोडा टाकल्याचा आरोप आहे. महसुली उत्पन्नातील रक्कमेचे धनादेश बेकायदेशीररित्या कंपन्यांना देऊन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केले जात असल्याचे आंदोलकांचे मुख्य आक्षेप आहेत.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन
या गंभीर गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाने पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणात्मक आंदोलन सुरू केले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गटविकास अधिकारी महेश कुचेवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. ग्रामपंचायतींमधील बायोमॅट्रिक खरेदी आणि इतर अवैध कामांची चौकशी समितीद्वारे सखोल चौकशी केली जाईल. सोमवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन कुचेवार यांनी दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर, संघटनेने आपले आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चौकशीत पारदर्शकता न मिळाल्यास पुन्हा तीव्र संघर्ष करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.