

विकास कांबळे
कोल्हापूर : गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजर्षी शाहू मार्केटमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 48 हजार 158 क्विंटलने आवक घटली आहे. त्यामुळे साधारणत: पावणेदोन कोटींची उलाढाल कमी झाली आहे.
कोल्हापुरातील गुळाची बाजारपेठ देशभर प्रसिद्ध आहे. रंग, चव आणि टिकाऊपणामुळे देशाबाहेरदेखील येथील गुळाला चांगली मागणी असते. त्यामुळे दरही चांगला असल्याने शेतकरी गुर्हाळाला प्राधान्य द्यायचा. अलीकडे जिल्ह्यात साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. कारखान्यांत ऊस मिळविण्यासाठी चढाओढ असते. यातून जादा दर देण्यासाठी स्पर्धा सुरू असल्यामुळे उसाला चांगला भाव मिळत आहे. शेतकरी आंदोलनही त्याला कारणीभूत आहे. दुसरीकडे, कामगारांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे गुर्हाळघरे अडचणीत येऊ लागली. त्यांची संख्याही कमी होऊ लागली. पूर्वी जिल्ह्यात हजारावर गुर्हाळघरे होती, त्यापैकी सध्या वीस ते तीस टक्केच शिल्लक राहिली आहेत.
जूनच्या दुसर्या आठवड्यापर्यंत गुर्हाळघरे सुरू असायची. जुलैमध्ये हंगाम संपायचा. परंतु, यावेळी मेच्या दुसर्या आठवड्यापासूनच पावसास सुरुवात झाल्यामुळे गुर्हाळघरांना अडचणी येऊ लागल्या. त्याचा परिणाम गुळाच्या उत्पादनावर झाला. गेल्यावर्षी 2023-2024 मध्ये 224 कोटी 95 लाख 47 हजार रुपये उलाढाल झाली होती. यावर्षी ही उलाढाल 1 कोटी 68 लाख 40 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
2023-24
6 लाख 81 हजार
681 क्विंटल
2024-25
6 लाख 33 हजार
523 क्विंटल