

कोल्हापूर : महाराष्ट्रातील नांदणी येथील हत्तीण कशाप्रकारे परत आणता येईल याचा विचार करावा. संबंधित यंत्राणांना तशा सूचना देऊन मठाचे महत्त्व आणि हत्तीणीची परंपरा अबाधित राखण्यासाठी योग्य पावले उचलावीत, असे पत्र खासदार शाहू महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी पाठविले.
नांदणी येथील जैन मठात रुढी, परंपरा, इतिहास याची जपणूक करण्यासाठी व्यवस्थापनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून हत्ती पाळला जातो. सद्या असणार्या माधुरी तथा महादेवी हत्तीणीची परिसरातील लाखो लोकांशी भावनिक नाळ जुळली आहे. गेल्या 33 वर्षांपासून लाखो कुटुंबीयांची लाडकी असलेल्या या हत्तीणीची प्रकृती अतिशय उत्तम आहे. तरीही काही प्राणी मित्र संस्थांच्या पदाधिकार्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करून तिला जखमा झाल्याचे कारण देत वनतारा या गुजरात स्थित अभयारण्यात सोडण्याची मागणी केली होती. न्यायालयानेही प्राणी मित्र संस्थांची याचिका मंजूर करत तिला वनतारा येथे सोडण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तेथेही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम करण्यात आला. त्यामुळे वनतारा येथील आलेल्या पथकाने या हत्तीणीचा ताबा घेऊन तिला वनतारामध्ये नेऊन सोडले आहे. याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांनी रस्त्यावर येऊन विरोध सुरू केला आहे. पोलिस बळाचा वापर करून हत्तीणीला गुजरातकडे नेण्यात अल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. मठाधिशांसह सर्व धर्मीय हजारो भाविक आजही या हत्तीणीच्या आठवणीने व्याकुळ होऊन अश्रू ढाळत आहेत. याबाबत कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभर असंतोष दिसत आहे. यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी खा. शाहू महाराज यांनी पत्राद्वारे केली आहे.