कोल्हापूर : संपूर्ण बहुजन समाजासाठी अखंड सक्रिय असणारा मराठा समाज आज शैक्षणिक व आर्थिकद़ृष्ट्या मागास राहिला आहे. यामुळे आरक्षणाची नितांत गरज आहे. शासनाने मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून विविध योजनांचे लाभ देऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125 वर्षे) राज्यव्यापी मेळावा रविवारी रंकाळा तलाव परिसरातील दत्त मंगल कार्यालयात झाला. महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पूजनाने मेळाव्याचा प्रारंभ झाला. यावेळी शिवशाहीर दिलीप सावंत व मिलिंद सावंत यांनी स्फूर्तीदायी कवणांचे सादरीकरण केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते रणरागिणी ताराराणी यांच्या 350 व्या जयंतीदिनी 10 हजार दुर्मीळ छायाचित्रांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. चंद्रदीप नरके, आ. जयंत आसगावकर, माजी आ. प्रकाश आवाडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, सरचिटणीस प्रमोद जाधव, गुलाबराव गायकवाड, अरविंद देशमुख, डॉ. संदीप पाटील, मानसिंग बोंद्रे यांच्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार्या मराठा समाजाला एकटे पाडण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. यावर उपाय म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने समाजाला सावरण्यासाठी यथाशक्ती योगदान देणे काळाची गरज आहे. तसेच समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहेत.
खा. धनंजय महाडिक यांनी, मराठा समाजातील युवकांनी नोकरीप्रमाणेच उद्योग-व्यवसायासाठी प्रयत्न करावेत. लोकप्रतिनिधी व शासनाने त्यांना यासाठी विविध योजनांचे पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
खा. धैर्यशील माने यांनी, मराठा महासंघाचे कार्य शिवछत्रपतींच्या व्यापक सर्व जाती-धर्मियांच्या रयतेच्या स्वराज्याप्रमाणे आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांनी बहुजन समाज आणि सर्व धर्मियांना एकत्र घेऊन वाटचाल करणारा असल्याचा अभिमान व्यक्त केला.
वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. मराठा भवनच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या 125 वर्षांच्या वाटचालीत सक्रिय सहभाग देणार्या कार्यकर्त्यांचा विशेष गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश पाटील, महादेव जाधव, मारुती जाधव, शिवाजीराव गराडे, गणपतराव जाधव, डॉ. शिवाजीराव हिलगे आदींचा यात समावेश होता.
मेळाव्यात मराठवाडा-विदर्भातील पूरग्रस्तांना सढळ हाताने मदतीचे आवाहन खासदार-आमदार आणि महासंघाच्या पदाधिकार्यांनी केले. तसेच त्यांनी स्वत: केलेल्या मदतीची माहितीही दिली. खा. धनंजय महाडिक यांनी पूरग्रस्तांना 50 लाख रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याची मदत दिल्याचे सांगितले, तर राजेंद्र कोंढरे यांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलल्याची माहिती दिली. खा. धैर्यशील माने यांनी नवरात्र व दिवाळी सणातील खर्च कमी करून पूरग्रस्तांना यथाशक्ती मदतीचे आवाहन केले. रिक्षाचालक शाहीर मिलींद सावंत यांनीही मदत जाहीर केली.
मराठा महासंघ व स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे आय.टी. पार्क परिसरात नियोजित जागेवर मराठा भवन उभारण्यासाठी भरघोस निधी संकलन मेळाव्याच्या निमित्ताने झाले. यापूर्वीच्या 35 लाखांत आणखी 26 लाख रुपयांची भर पडली. यावेळी माधवराव घाटगे 11 लाख, शाहूवाडी तालुका 11 लाख रुपये, उद्योजक शंकर पाटील 5 लाख, सुरेंद्र जैन 5 लाख, उद्योजक संजय जाधव 2 लाख, मुळीक परिवार 1 लाख, महादेव म्हात्रे 1 लाख, उदय देसाई 51 हजार, के.पी. खोत 50 हजार, शंकरराव शेळके 50 हजार, अनिल नाटेकर 50 हजार, संभाजी पाटील 25 हजार, प्रकाश पाटील 25 हजार, पांडुरंग हजारे 11 हजार, सौ. संपत्ती गणेश पाटील 11 हजार अशी उत्स्फूर्त मदत दिली. तसेच उपस्थित खासदार व आमदारांनी सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त मराठा भवनसाठी सर्वोतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.