

विशाळगड : मणिपूर येथे झालेल्या भूस्खलनात शहीद झालेले वीर जवान सुनील गुजर यांचे पार्थिव सोमवारी (दि.१७ ) सकाळी १० वाजता त्यांच्या मूळ गावी शित्तूर तर्फ मलकापूर येथे आणण्यात येणार आहे. चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यांचा डोजर घसरून ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळला. लष्करी चेकपोस्टजवळचा रस्ता दुरुस्त करत असताना जवान सुनील गुजर यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
पार्थिव पोहोचण्यास विलंब
प्रशासकीय प्रक्रिया आणि वेळेच्या अडचणींमुळे पार्थिव आज शनिवारी (१५ मार्च) गावी पोहोचू शकले नाही. दिब्रुगड विमानतळावर वेळेत पोहोचणे शक्य न झाल्याने, उद्या रविवारी दि १६ रोजी सकाळी साडेसात वाजता दिब्रुगडहून विमानाने पार्थिव संध्याकाळी पुण्यात आणले जाईल, असे प्रशासनाने कळवले आहे.
अंत्यसंस्कार सोमवारी सकाळी १० वाजता
दिब्रुगडहून कोलकाता आणि कोलकाताहून विमानाने पुण्याला आणल्यानंतर, सोमवारी सकाळी सैन्य दलाचे पथक वीर जवान शहीद सुनील गुजर यांचे पार्थिव पुण्याहून अँब्युलन्सद्वारे शित्तूर तर्फ मलकापूर येथे सकाळी १० वाजता घेऊन गावी पोहोचतील.
गावावर शोककळा
जवान सुनील गुजर यांच्या निधनाची बातमी गावात समजताच, सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेली तीन दिवस गावात सन्नाटा आहे, सारा गाव शोकसागरात बुडाला आहे.
सुनील गुजर हे भारतीय सैन्य दलात २०१९ मध्ये भरती झाले होते. पुणे येथे बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे ११० इंजिनियर रेजिमेंट बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये सेवा बजावत होते. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना ते डोजर ऑपरेटर म्हणून काम करत होते. सुनील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण गावातच झाले. २०२३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई लक्ष्मी, वडील विट्ठल, पत्नी स्वप्नाली, पाच महिन्यांचा मुलगा शिवांश, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.