Illegal Abortion Case | गर्भलिंग निदान कोल्हापुरात, तर गर्भपात साखरप्यात

स्वप्निल पाटील टोळीचे कनेक्शन रत्नागिरीपर्यंत
Illegal Abortions Case|
Illegal Abortion Case | गर्भलिंग निदान कोल्हापुरात, तर गर्भपात साखरप्यातFile Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील याने कोल्हापुरात गर्भलिंग निदान केलेल्या काही रुग्णांनी देवरूख परिसरात गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. साखरपा येथील एका डॉक्टरने गुरुवारी (दि. १९) एका महिलेचा गर्भपात करताना तिची प्रकृती खालावल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली. याप्रकरणी डॉ. विजय गोपाळ नारकर (वय ६२, रा. साखरपा, रत्नागिरी) याच्यासह संबंधित महिलेच्या पतीस देवरूख पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील याच्या थ्री स्टार लाॅजिंगमधील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रावर २६ जुलै २०२६ रोजी छापा टाकला होता. यानंतर या रॅकेटच्या अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या. निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत गायकवाडने ४०३ गर्भपात केल्याचे समोर आले होते. छाप्यानंतर स्वप्निल पाटील गायब झाला होता. त्याने पसार झालेल्या काळातही गर्भलिंग निदान केल्याचे समोर आले होते. याच काळात तपासणी केलेली एक महिला साखरपा येथील डॉक्टर विजय नारकर याच्याकडे १९ नोव्हेंबर रोजी गर्भपातासाठी गेली होती. गर्भपात करताना अतिरक्तस्त्राव झाल्याने त्या महिलेची प्रकृती चिंताजनक बनली. रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटल येथे संबंधित महिलेस दाखल केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता झाली. याप्रकरणी डॉ. नारकरसह संबंधित महिलेच्या पतीस अटक केली आहे.

कोल्हापूर पोलिसही ताबा घेण्याची शक्यता

स्वप्नील पाटीलने तपासणी केलेल्या महिलेचा गर्भपात डॉ. नारकरने केल्याचे समोर आले आहे. स्वप्नीलने डॉ. नारकरकडे किती रुग्ण गर्भपातासाठी पाठवले याचा तपास करण्यासाठी तसेच गर्भपाताची पुढील साखळी शोधण्यासाठी डॉ. नारकरचा ताबा घेण्याची शक्यता आहे. डॉ. नारकर याच्यावर २०२३ मध्ये करवीर पोलीस ठाण्यातच या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

रंकाळा स्टँड परिसरातील लाड नावाचा एजंट कोण?

संबंधित महिलेच्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. स्वप्निल पाटीलकडे तपासणी केल्यानंतर ती महिला गर्भपातासाठी रंकाळ स्टँड परिसरातील लाड नावाच्या एजंटच्या मदतीने डॉ. नारकर याच्याकडे पाठविली होती. त्या एजंटचा शोध घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.